वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्लेत नगरपरीषद क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांसह शहरातील पर्यटन पुरक महत्वपूर्ण विकास कामे व उपजिल्हा रूग्णालयासाठी रूग्णालयाच्या संरचनेप्रमाणे अत्यावश्यक ते डॉक्टर व स्टॉफ देण्याची मागणी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचेकडे त्याच्या दालनांत प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची आज शनिवारी त्यांच्या मंत्रालयातील दालनांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांनी सिंधदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ले प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर, तालुका महिला अध्यक्ष सौ दिपिका राणे या शिष्टमंडळासमवेत भेट घेतली. यावेळी वेंगुर्ले नगरपरीषद क्षेत्रातील विकास कामांबाबत चर्चा करण्यांत आली. तसेच सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यांत आलेल्या उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांची व स्टॉफची कमतरता असल्याने रूग्णांना सेवा मिळण्यास अडचण होते. त्यामुळे रूग्णालयास अत्यावश्यक ते डॉक्टर व स्टॉफ द्यावा. तसेच अवेळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू उत्पादक बागायतदारांचे नुकसान झालेले त्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत द्यावी. अशी मागणी करत विविध विकास कामांचे निवेदन त्यांना सादर केले. या शिष्टमंडळास विकास कामंसाठी निधी देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती नितीन कुबल यांनी दिली.









