बेळगाव बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या दक्षिण भागासाठी उपनोंदणी कार्यालय स्वतंत्र करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, हे अत्यंत चुकीचे असून एकाच ठिकाणी उपनोंदणी कार्यालय असणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्या ज्या ठिकाणी उपनोंदणी कार्यालय आहे त्याच ठिकाणी हे कार्यालय सुरू करावे. गोवावेसकडे कोणत्याही परिस्थितीत येथील कार्यालय हलवू नये, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपनोंदणी कार्यालयावरील तणाव कमी करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या असलेल्या उपनोंदणी कार्यालयाच्या परिसरात न्यायालय आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणीच जिल्हाधिकारी, भूमी कार्यालय, एडीएलआर कार्यालय, जवळच तहसीलदार कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आहे. तेव्हा कोणतीही कागदपत्रे हवी असल्यास तातडीने त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे काम करणे सोपे जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे वकिलांना त्याचा फायदा होणार आहे. दक्षिण भागाकडे झाल्यास न्यायालयातील कामे अर्धवट सोडून तिकडे धाव घ्यावी लागणार आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत येथील कार्यालय हलवू नये, अशी मागणी वकिलांनी निवेदनात केली आहे. भले दक्षिणसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करा. मात्र ते न्यायालयाच्या परिसरातच राहणे महत्त्वाचे आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत येथील कार्यालय हलवू नये. हवी तर त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था याच कार्यालयात करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, सदस्य कलमेश मायाण्णाचे, ऍड. नामदेव मोरे यांच्यासह वकील उपस्थित होते.









