उदयनराजे कोणाच्या नावाची चिट्टी काढणार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांचा राजीनामा दिल्यामुळे नव्याने निवडीचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी उशिरा निघाला. नगराध्यक्षा माधवी कदम यांची सहीने सायंकाळी उशिरा होताच उपनगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार, मनोज शेंडे की श्रीकांत आंबेकर की आणखी कोण?, खासदार उदयनराजे हे ऐनवेळी कोणाच्या नावाची चिट्टी काढणार याकडे उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, स्वीकृतच्या निवडीचाही कार्यक्रम दि. 5 रोजीच घेण्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाची धडपड सुरु आहे. यास मंगळवारी यश आले नव्हते.
सातारा पालिकेत उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी आपल्या पदाचा नेत्यांच्या सूचनेनुसार राजीनामा दिला. त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले. पायाला भिंगरी लावून त्यांनी सॅनिटायझर फवारणी केली. परंतु आघाडीच्या निर्णयापुढे कोणाचे काही चालत नाही. त्यांचा राजीनामा झाल्यानंतर नव्याने निवडी होण्यासाठी मनोज शेंडे आणि श्रीकांत आंबेकर यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. उपनगराध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे हे कोणाच्या डोक्यावर मुकूट देतात, कोणाच्या नावाची चिट्टी काढतात याकडेच लक्ष लागून राहिली आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 5 रोजी उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष सभा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
याच दिवशी स्वीकृतच्या निवडीचा कार्यक्रम लागावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत होते. मंगळवारी दिवसभर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव घेवून पालिकेचे अधिकारी होते. परंतु जिल्हाधिकारी हे अन्य कामात व्यस्त असल्याने काहीच निर्णय झाला नाही. जिल्हाधिकाऱयांची सही झाल्यानंतर प्रांताधिकाऱयांच्या विचाराने स्वीकृतच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. अजूनही एक दिवस मध्ये असला तरीही दि. 5 रोजीच्या उपनगराध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाच्या बरोबरीने स्वीकृतच्या निवडीचा कार्यक्रम होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, स्वीकृतसाठी शाहुपुरीतून अनेक नावे पुढे येत आहेत. त्यात उदयनराजे हे कोणाला संधी देतात त्यावरुन तेथे जमेचे राजकारण होणार आहे, अशीही चर्चा सुरु आहे.