डॉ. प्रसाद देशपांडे यांचे प्रतिपादन : चिदंबर मंदिरात सामुदायिक उपनयन
प्रतिनिधी /बेळगाव
सोळा संस्कारांपैकी पाचवा आणि महत्त्वाचा संस्कार म्हणजे उपनयन होय. त्यामुळे लहान मुलांवर चांगले संस्कार होतात. उपनयन म्हणजेच ज्ञानाचा तिसरा डोळा उघडणे होय. त्या दृष्टीने हा संस्कार आवश्यक आहे, असे विचार माधवबाग संस्थेचे कर्नाटक राज्य प्रमुख डॉ. प्रसाद देशपांडे यांनी व्यक्त केले.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ व समर्थ पेडिट को-ऑप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिदंबरनगर येथील चिदंबर मंदिरात सामुदायिक उपनयन समारंभ झाला. एकूण 7 बटूंवर हा उपनयन संस्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. प्रसाद देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे व समर्थ सोसायटीचे नरहरी जोशी होते.
उपस्थितांचे स्वागत करून चेअरमन जोशी म्हणाले की, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाची नवी कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर पूर्वी आलेली मरगळ झटकून टाकून पुन्हा नव्या जोमाने कामास लागण्याचा निर्णय 2017 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला. त्याला अनुसरून गेले वर्ष कोविडचा अपवाद वगळता चार वर्षे अतिशय उत्साहाने सर्व कार्यक्रम पार पाडले. त्यामध्ये शिष्यवृत्ती वितरण, रक्तदान शिबिर, कोजागरी पौर्णिमा, गोकुळाष्टमी यासारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे, हे विशेषत्वाने नमूद करावे लागते.
सकाळी मातृभोजन, होमहवन, अक्षता हे मुख्य कार्यक्रम शास्त्राsक्त पद्धतीने करण्यात आले. या सर्व उपक्रमासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाला समर्थ सहकारी सोसायटी आर्थिक पाठबळ देत आहे. आभार संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी देशस्थ ऋग्वेदीचे उपाध्यक्ष विजेंद्र गुडी, सेपेटरी विनायक जोशी, समर्थ सोसायटीचे माजी चेअरमन संजीव अध्यापक, अरुण कुलकर्णी, सुनंदा व शेखर आळतेकर, चित्पावन संघाचे अध्यक्ष गोविंदराव फडके, सुधीर जोशी, अभय जोशी, अरविंद कुलकर्णी, राघवेंद्र देशनूर यांच्यासह कर्मचारी व विविध ब्राह्मण संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळ एकंदर 7 बटूंचा सामुदायिक उपनयन समारंभ पार पडला.









