प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात दि. 22 जुलैपासून पुरस्थिती निर्माण झाली आहे. सातारा शहरात देखील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला असलेल्या घरांना दरडी कोसळण्याची भिती असल्याची शक्यता गृहीत धरुन पालिकेच्यावतीने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माची पेठ, बोगदा पॉवर हॉऊस, केसरकर पेठ या ठिकाणची पाहणी करुन शेंडे यांनी पालिकेच्या अभियंत्यांना यासंदर्भात सूचना दिल्या.
सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला असलेल्या माची पेठ, केसरकर पेठ, पॉवर हाऊस झोपडपट्टी, बोगदा या भागाला दरडी कोसळण्याचा धोका आहे. 2017 मध्ये केसरकर पेठेमध्ये एका घरावर दरडीचा काही भाग आला होता. त्यावेळी पालिकेच्यावतीने पाहणी करण्यात आली होती. तसेच बोगदा परिसरातही त्यावेळी काहीशी दरड खाली आली होती. या पावसाने सातारा शहरात कोठे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे काय याची पाहणी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पालिकेच्यावतीने करण्यात आली. त्यांनी केसरकर पेठ, माची पेठ, पॉवर हाऊस या भागामध्ये डोंगर उताराच्या बाजूला जे नागरिक राहतात त्यांची भेट घेवून माहिती घेतली. तसेच नगरअभियंता दिलीप चिद्रे यांना सूचना देत नागरिकांना मदत लागल्यास पालिकेकडून सहकार्य राहिल, असे आश्वासन त्यांनी दिले.