प्रतिदिन मृत्यूसंख्याही हजाराखाली, मात्र, दक्षता आवश्यकच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. सोमवार ते मंगळवार या 24 तासांमध्ये देशात 37,566 नवे रुग्ण आढळले आहेत. ही संख्या गेल्या 100 दिवसांमधील सर्वात कमी आहे. याच कालावधीत 56,994 रुग्ण बरे झाले आहेत. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 52 हजार 659 इतकी असून या चोवीस तासांमध्ये एकंदर 907 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
देशात आतापर्यंत कोरोनाचे एकंदर 3 कोटी 3 लाख 16 हजार 897 रुग्ण आढळले आहेत. बरे झालेल्यांची संख्या 2 कोटी 93 लाख 66 हजार 601 आहे. तर एकंदर 3,97,637 जणांच्या मृत्यू या विषाणूमुळे झाला आहे. कोरोनाचा दुसरा उद्रेक आता कमी झाला असला तरी परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच मास्कचा उपयोग आणि सामाजिक अंतरासह इतर नियमांचे पालन लॉकडाऊन पूर्ण उठल्यानंतरही करणे अनिवार्य आहे, असा इशारा या क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्रच आघाडीवर
एकंदर रुग्णसंख्या, मृतांची संख्या आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या यात आजही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून येते. केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतही रुग्णसंख्या जास्त असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता सर्वच राज्यांमधील रुग्णंख्या कमी होत असून दिल्लीतली परिस्थिती सुधारली आहे.
डेल्टाची अनाठायी चिंता नको
कोरोनाचा दुसरा उद्रेक आटोक्यात येत असताना तिसऱया उद्रेकाची चिंताही वाढत आहे. मात्र, यासंबंधी अनाठायी भीती बाळगण्यात किंवा निर्माण करण्यात येऊ नये असे आयसीएमआरसह अनेक संस्थांनी तसेच तज्ञांनी बजावले आहे. तसेच नव्या डेल्टा विषाणूसंबंधीही अफवा पसरविल्या जाऊ नयेत. हा विषाणू जास्त घातक असल्याचा पुरावा सापडलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.









