समर्थांनी दासबोधातील मायोद्भवनिरुपण समासात म्हटले आहे की,
भूमंडळापासून उत्पत्ती !
जीव नेणो जाळे किती !
परंतु ब्रम्ह आदिअंती !
व्यापून आहे !!
जे जे कांही निर्माण जालें !
तें तें अवघेची नासलें !
परी मुळीं ब्रम्ह तें संचलें !
जैसें तैसें !! 06/03/14-1
याचा अर्थ असा आहे की, पृथ्वीवर अनेक जीव उत्पन्न झाले पण याची गणती केली जाऊ शकत नाही. हे सर्व जीव नष्ट झाले. परब्रह्म मात्र अनादी कालापासून सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. जे जे निर्माण झाले त्याला त्याला नाश आहेच. कारण पंचमहाभूते ही मायेपासून निर्माण होतात. परब्रह्म हे स्वयंभू आहे. अनादी आद्य आहे आणि सर्वत्र तरीही व्यापून राहिलेले आहे.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने या ओव्यांचा विचार केल्यास असे जाणवते की औद्योगिक क्षेत्रात, आस्थापनात, संस्थेत किंवा उद्योग समूहात अनेक उपक्रम राबवले जातात. राबवणारे काही कालावधीनंतर संबंधित संस्था, उद्योगसमूह किंवा आस्थापना सोडून इतरत्र जातात पण त्यांनी केलेल्या उपक्रमांचा प्रभाव आणि त्यांचा त्या उपक्रमातील सहभाग मात्र चिरंतन काळ टिकलेला असतो. संबंधित संस्थांमध्ये येणारे अनेक कामगार, कर्मचारी, अधिकारी किंवा व्यवस्थापकांना पूर्वी केलेल्या सकारात्मक उपक्रमांचा लाभ आणि चांगली फळे ही नेहमीच चाखायला मिळतात. म्हणूनच प्रत्येक संस्थेतील व्यवस्थापन हे अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न किंवा नैतिक जबाबदारी ही त्या त्या संस्थेतील संस्थापक, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर असते. कारण त्यांच्या वर्तमानकाळातील कर्मावर किंवा क्रियेवरच भविष्यातील औद्योगिक संस्थेचे चित्र तयार होत असते. औद्योगिक विश्वात किंवा बाजारपेठेत जर एखाद्या औद्योगिक संस्थेला किंवा उद्योग समूहाला स्वतःची प्रति÷ा किंवा नावलौकिक प्राप्त करायचा असेल तर अगदी सुरुवातीपासून त्या समूहातील संस्थापकांनी किंवा उच्चपदस्थ व्यवस्थापकांनी श्रीसमर्थांचा दासबोध अभ्यासणे आणि त्याद्वारे समूहातील व्यवस्थापन सशक्त करणे गरजेचे आहे.
अनेकानेक नवीन उद्योग सुरू होतात पण अल्पावधीतच त्यांना उतरती कळा लागते. कारण तेथील व्यवस्थापन सशक्त नसते. व्यवस्थापन सशक्त करायचे असेल तर उद्योजकाला उद्योग समूहातील प्रत्येक घटकाशी जुळवून घ्यावे लागते. कमी कालावधीत जास्तीत जास्त सकारात्मक कार्य कसे केले जाईल ह्याचा विचार करूनच पुढील योजना राबवाव्या लागतात. ह्याकरिता उद्योग समूहातील प्रत्येक घटकात विश्वास निर्माण करूनच उपक्रमांची आखणी करावी लागते. नियोजन जर उत्तम असेल तरच व्यवस्थापन मजबूत बनत असते. उत्तम नियोजन कसे करावे हे श्रीसमर्थांच्या दासबोधाचा सातत्याने अभ्यास केल्यास जाणवते.
अनेकवेळा एखादा उपक्रम राबवत असताना त्यातील नियोजनात त्रुटी असू शकतात पण ह्या त्रुटींवर लवकरात लवकर मात करून ठरवलेले ध्येय प्राप्त करणे गरजेचे असते. कारण ध्येय गाठत असताना प्रत्येक अडचणींशी सामना करण्यात वेळ वाया न घालवणे हे एका उत्तम व्यवस्थापकाचे लक्षण असते. ह्या अडचणी काही अंशी भावनिक स्तरावर किंवा व्यावहारिक स्तरावरदेखील असतात. पण ह्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योग समूहाला कसा लाभ करवून घेता येईल ही कला शिकायची असेल तर श्रीमद्दासबोधातील व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.
आपल्या देशात लोकसंख्या ही खूप मोठी अडचण आहे, संकट आहे की संधी आहे ह्याचा विचार केल्यास असे लक्षात येऊ शकते की लोकसंख्या ही खूप मोठी संधी आहे. कारण मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते. पण त्याशिवायही इतर गरजा असतात. ह्या गरजांची पूर्तता करण्यासाठीही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ह्या गरजा ज्या नवउद्योजकांनी ओळखल्या आणि त्याद्वारे जर स्वतःच्या उद्योगाचा विस्तार करायचे ठरवले तर समर्थ भारताची निर्मिती होऊ शकते.
इंग्रजी भाषेत असे म्हणतात की Unemployment is not a problem but self employment is required म्हणजे बेरोजगारी हा प्रश्न नसून स्वयंरोजगार अत्यावश्यक आहे. नेमकी हीच परिस्थिती आज आपल्या देशात काही प्रमाणात पहायला मिळते. कारण नवीन विचार, नवीन संकल्पना राबवण्याचे धाडस अनेकवेळा आपल्या देशात होताना दिसत नाही. ह्यामागील मूळ कारण हे आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेतही असू शकते. कारण इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीने आपल्या देशात काही अंशी संकुचित विचार रुजवला आहे. त्यामुळे धोका पत्करणे, जोखीम पत्करण्याची व्यापक मानसिकता तयार होण्यास बाधा उत्पन्न होते आहे. पण ह्यावरील उपाय म्हणजे संत-साहित्याचा अभ्यास करणे होय. श्रीसमर्थांनी दासबोधाद्वारे जे समाजाचे प्रबोधन केले, मनाच्या श्लोकांद्वारे जी शिकवण दिली आणि ज्याप्रकारे भारतीय समाजात नवचैतन्य निर्माण केले त्याची उजळणी करणे अत्यावश्यक आहे.
एकेकाळी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. मुळात ही वास्तविकता होती. कारण त्याकाळचा समाज हा आजच्या काळातील समाजापेक्षाही खूप प्रगल्भ होता. बारा बलुतेदार पद्धती आपल्या देशात होती त्यामुळे गरजा जरी कमी असल्या तरी त्यांची पूर्तता तत्काळ होत होती. आज आपल्या अपेक्षा आणि गरजा खूप वाढल्या आहेत पण अपेक्षापूर्ती किंवा गरजांची पूर्तता तात्काळ होईलच असे नाही. त्यामुळे काही वेळा समाजात एक नकारात्मक किंवा असंतोषाचे वातावरणही निर्माण होते. ह्यावरील उपाय म्हणजे मानसिकदृष्टय़ा आपण सामाजिक स्तरावर सशक्त होणे, संयमित जीवनपद्धती अवलंबणे आणि व्यापक दृष्टीकोन बाळगणे. हे सर्व काही दासबोधाच्या अभ्यासाने, चिंतनाने आणि दासबोधातील व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात केल्याने प्राप्त होऊ शकते.
इंग्रजीत असेही म्हणतात की Hobby Becomes a Vocation & Vocation becomes a profession म्हणजे सुरुवातीला जोपासलेला छंद हा उपजीविकेचा मार्ग बनवावा आणि हाच उपजीविकेचा मार्ग व्यवसायात परिवर्तीत करावा. ह्यानुसार जर आपल्या देशातील प्रत्येक समाज घटकाने स्वतःच्या विचारांची दिशा बदलली तर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती उद्योजक होऊ शकेल आणि प्रत्येक घरात व्यवसायवृद्धी होईल. अर्थातच ह्या प्रक्रियेस थोडा कालावधी लागू शकतो. ही प्रक्रिया अवघड जरूर आहे पण अशक्मय निश्चितच नाही. ह्याकरताच सातत्याने दासबोधातील व्यवस्थापकीय कौशल्य शिकणे आणि इतरांना शिकवणे जरुरीचे आहे. ह्याचा खूप मोठा लाभ आपल्या देशातील येणाऱया अनेक पिढय़ांना होऊ शकतो. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात की, सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे! परंतु तेथे भगवंताचे! अधिष्ठान पाहिजे!!
माधव किल्लेदार








