ऑनलाईन टीम / नाशिक :
लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवस- रात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसांना निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यायतक्षम काकडी भेट म्हणून दिली आहे. शरीराला लाभदायी ठरणारी काकडी मिळाल्याने पोलिसांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले असून शिंदे यांच्या या संकल्पनेचे व औदार्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी देखील कौतुक केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना नाशिक शहरातील विविध चौकात चेक पोस्टवर दिवसभराच्या उन्हात बंदोबस्ताला उभे राहावे लागत आहे. नाशिकचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे. मात्र, लोकसेवेसाठी ‘ड्युटी फर्स्ट’ मानणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही माणूसकीची सावली आणि आपुलकीची गरज असते. देशसेवा करणाऱ्या हातांना आपलेही बळ लाभो या विचाराने शिंदे यांनी एक्सपोर्ट क्वालिटीची साडेआठशे किलो काकडी नाशिक शहरातील बंदोबस्तावर असणाऱ्या तीन हजार पोलीस बांधवांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वाटप केले आहे.
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंदे हे मध्यमवर्गीय युवा शेतकरी आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्य शासनाचा कृषी पुरस्कार ही त्यांना मिळालेला आहे.









