कणकवली / प्रतिनिधी:
ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे संस्थापक, फोंडाघाटच्या माळरानावर कृषीनंदवन फुलविणारे उद्योगपती नामदेव राजाराम मराठे ( 60 ) यांचे मुंबई येथे खाजगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपले असून एकूणच समाजाची फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
नामदेव मराठे यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली होती. येथील खाजगी रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. मुंबईतील खाजगी रुग्णलयात उपचारादरम्यान सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
घोणसरी गावचे सुपुत्र असलेले नामदेव मराठे यांनी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील आपला व्यवसाय सांभाळतानाच आपल्या मूळ गावी घोणसरी येथे येत ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाची स्थापना केली. दापोली कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषितंत्र पदविका विद्यालय, कृषी महाविद्यालय, ज्युनिअर विज्ञान कॉलेज, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ निगडित कॉलेजच्या माध्यमातून फोंडघाट दशक्रोशी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा दीपेश, सून, मुलगी रचना असा परिवार आहे.
Previous Articleसावंतवाडी-भेकूर्ली बस सुरु करा !
Next Article मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलावर राहुल गांधी म्हणाले…









