परंपरागत स्वरुपात उद्योग-व्यापार-व्यवसायाचे केंद्रीकरण हे मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई व अहमदाबाद या आणि यासारख्या मेट्रो-महानगरांमध्ये झाले होते. विविध कारणांमुळे व राजकीय-आर्थिक धोरणात्मक निर्णयांमुळे या महानगरांमधील आर्थिक-व्यावसायिक दृढीकरण अधिक सुदृढ होत गेले हा इतिहास आहे. मात्र गेल्या दशकामध्ये या साऱयाच परिस्थितीत बदल झालेला दिसून येतो. आर्थिक-औद्योगिक विकासाचा व त्याद्वारे होणाऱया समृद्धीrचा विकासमार्ग महानगरांकडून मोठय़ा शहरांकडे होत असल्याचे दिसून येत असून त्याचाच हा आढावा…
हुरुन या इंग्लंडमधील आर्थिक-औद्योगिक क्षेत्रात संशोधन-प्रकाशन करणाऱया संस्थेतर्फे गेली 10 वर्षे वार्षिक स्वरुपात आर्थिक-औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय व यशस्वी कामगिरी करणाऱया उद्योग आणि उद्योजकांचा अभ्यासपूर्ण अभ्यासासह तपशील प्रकाशित करण्याचे महनीय काम करण्यात आले आहे. हुरुनतर्फे 2012 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पहिल्या अहवालात मोठय़ा शहरांमध्ये 1000 कोटी अथवा त्याहून अधिक व्यावसायिक उलाढाल असणाऱया उद्योजकांची संख्या शंभरीमध्ये होती तर 2022 च्या नव्याने प्रकाशित अहवालानुसार 1000 कोटी अथवा त्याहून अधिक उलाढाल करणाऱया व मोठय़ा शहरांमध्ये कार्यरत असणाऱया यशस्वी उद्योजकांची संख्यादेखील 1000 हून अधिक झाली आहे.
शहरांमधील या वाढत्या व यशस्वी उद्योगांमध्ये उत्पादन क्षेत्र, सेवा उद्योग, वित्तीय सेवा, अन्न प्रक्रिया उद्योग व हिरे उत्पादन यासारख्या विविध उद्योगांचा प्रामुख्याने समावेश आहे. आधीची आकडेवारी लक्षात घेता विविध शहरांमध्ये 1000 कोटीहून अधिक उलाढाल यशस्वीपणे करणाऱया या निवडक उद्योग आणि उद्योजकांची संख्या आता 3000 पेक्षा अधिक झाली आहे.
भारतातील मेट्रो वा महानगरांशिवाय इतर शहरांमध्ये उद्योग व्यवसायांची वाढ आणि सद्यस्थिती याची योग्य आणि पुरेशी नोंद होत नसल्याची बाब यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे. या संदर्भातील प्रमुख उदाहरण म्हणजे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटच्या 2020 मधील दक्षिण भारतात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे देता येईल. या छोटेखानी सर्वेक्षणात समाविष्ट शहरांच्या औद्योगिक विकासाचा मागोवा घेता भारताला जागतिक स्तरावर वेगाने विकसित होणाऱया देशात अग्रणी स्थान मिळाले.
त्यावेळच्या सर्वेक्षणातील देशातील ज्या सहा औद्योगिकदृष्टय़ा विकसित शहरांचा समावेश झाला त्यामध्ये दक्षिण भारतातील केरळमधील मल्लपुरम्, कोझिकोड, कोल्लम व त्रिसूर या चार शहरांचा समावेश केला गेला. अन्य दोन शहरे होती गुजरातमधील सूरत व तामिळनाडूमधील तिरुपूर. या अहवालावर जाहीरपणे प्रतिक्रिया देताना विख्यात उद्योगपती आनंद महिंद्र यांनी मुंबई, दिल्ली, कोलकत्ता या प्रस्थापित व चाकोरीबद्ध महानगरांकडून उद्योजकतेचा प्रवास इतर शहरांकडे सुरू झाला आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे.
सकृतदर्शनी असे दिसून आले की तंत्रज्ञानासह शैक्षणिक विकासाचे यासंदर्भात मोठे योगदान राहिले. विविध शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर, मोठय़ा संख्येत सुरू झालेल्या विज्ञान-तंत्रज्ञान व अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विषयातील पदवीसह उद्योजकतेकडे जाण्याची इच्छा मोठय़ा प्रमाणावर होत गेली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे या शहरांमध्ये आपापले उद्योग प्रस्थापित केलेल्या उद्योजकांच्या परिसरातील नवी पिढी अभियांत्रिकी, उद्योग व्यवस्थापन, उद्योजकता विकास यासारख्या क्षेत्रात शिक्षित प्रशिक्षित झाल्याने त्यांच्या प्रस्थापित उद्योगांना अधिक सक्षम व कार्यक्षम उद्योजक मिळत गेले. या साऱयांचा संयुक्त परिणाम लहान शहरांमधील उद्योगांच्या मोठय़ा विकासात होत गेला.
आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ अश्विन पारेख यांच्या मतानुसार 1990 नंतर देशात 250 विशेष शैक्षणिक विकास केंद्रे स्थापन होऊन कार्यरत झाली आहेत. याशिवाय देशात आज सुमारे 3000 उद्योजकता विकास केंद्रे कार्यरत असून विविध स्तरावर व विविध प्रकारच्या नव्या उद्योगांची स्थापना व प्रचलित व्यवसाय व व्यावसायिकांना मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. यातील अधिकांश केंद्र हे प्रामुख्याने महानगरांव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील प्रगत अशा शहरांमध्ये प्रामुख्याने होत आहे. परिणामी तेथील उद्योग व उद्योजकांना व्यवसायच नव्हे तर व्यवस्थापन विकासापर्यंत सर्वच क्षेत्रात झाला व त्यांच्या विकासाला चालना मिळाली.
अश्विन पारेख यांच्या विश्लेषणानुसार परंपरागतरित्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रात विशेष विकसित नसणाऱया या शहरांना प्रगत उद्योग आणि उद्योजकतेची झळाळी मिळण्यामागे मुख्यतः दोन कारणे आहेत. एक म्हणजे मुलभूत शिक्षणाच्या जोडीलाच उद्योजकता आणि औद्योगिक विकासाला पूरक असे व्यवस्थापन शिक्षण घेणारे नव-उद्योजक गेल्या दशकात स्वतःचा उद्योग विविध शहरांमध्ये सुरू राहण्यासाठी पुढे येत आहेत.महानगरांशिवाय विविध शहरांमध्ये प्रस्थापित व प्रचलित उद्योगांच्या प्रगती-उन्नतीचे चक्र झपाटय़ाने फिरू लागले आहे. हे पारेख यांच्यानुसार दुसरे महत्त्वाचे कारण. या उद्योजकांना त्यांची प्रस्थापित व्यावसायिक गुणवत्ता, क्षमता, आर्थिक स्थिरतेचा पिढीजात फायदा तर मिळतोच, त्याशिवाय महानगरांच्या तुलनेत इतर शहरांमध्ये उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक खर्च कमी येत असल्याने अशा उद्योगांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याचा मोठा फायदा होतो. विविध शहरांमधील प्रगतीशील व फायदेशीर उद्योगांच्या व्यवसाय-विकास व आर्थिक प्रगतीमागची वरील मुख्य दोन कारणे सर्वदूर अनुभवास येत आहेत.
दत्तात्रय आंबुलकर








