उत्सव सखीतर्फे मराठा मंदिरात फेम फिएस्टाचा शुभारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. वेगवेगळय़ा उद्योगांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनत आहेत. मात्र परस्परांचे अनुकरण न करता उद्योगामध्ये वेगळेपण आणा आणि नावीन्याची कास धरा, असे मत उद्योजिका आशा नाईक यांनी व्यक्त केले.
डॉ. अनुपमा जोशी संचालित उत्सव सखीतर्फे दि. 5 आणि 6 रोजी मराठा मंदिर येथे फेम फिएस्टाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक महिलांना क्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या उत्सवाचा हेतू आहे. कोविड-19 च्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होत आहे. या उत्सवाचे उद्घाटन आशा नायक व जलतरणपटू तन्वी दोड्डण्णावर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आशा नाईक बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, आज आपल्या उद्योगामध्ये वेगळेपण आणणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही असे वेगळेपण आणाल, तेव्हा ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल. त्याचबरोबर सातत्याने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. जेव्हा स्वावलंबी व्हाल तेव्हा संपूर्ण आकाश तुम्ही भरारी घेण्यासाठी खुले असणार आहे.
तन्वी दोड्डण्णवर म्हणाल्या, लहानपणापासून मी फेम फिएस्टाला येत आहे. येथे येणाऱया महिला अनेक गोष्टी करू शकतात. हे पाहून मलाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी सर्व स्टॉलधारक महिलांना शुभेच्छा दिल्या.
फेम फिएस्टाच्या आयोजक डॉ. अनुपमा जोशी यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन महिला परस्परांची ताकद होऊन अनेक उत्तम कार्य करू शकतात. कोविड असो, किंवा अतिवृष्टी असो महिला सर्व अडथळे पार करून स्वतःला सिद्ध करतात. स्टॉलधारक महिलांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वी होत आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रा. अरुणा नाईक यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले. या उत्सवासाठी प्रसाद, विजय, चेतना सारंग, कोमल मुलानी, सचिन मनगुळी यांचे सहकार्य लाभले आहे. उत्सवामध्ये सजावट, पोषाख, दागिने यासह विविध वस्तूंचे 60 हून अधिक तर खाद्यपदार्थांचे 16 हून अधिक स्टॉल आहेत. शनिवारी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हा उत्सव महिलांसाठी खुला आहे.









