30 हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात चौथ्या सत्रातील लॉकडाऊन सुरु आहे. काही नियम व अटींवर विविध उद्योगांना सुरूवात झाली आहे. परिणामी यामुळे विजेची मागणीही वाढत असल्याचे पहावयास मिळते आहे. उद्योग क्षेत्राने सुरुवात केल्यामुळेच वीज मागणी मागील मे महिन्याच्या तुलनेत चालू आठवडय़ामध्ये बंदच्या काळानंतर तेजीत आली असल्याची नोंद केली आहे.
वीज मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वीज पुरवठा 26 मे रोजी 1,66,420 मेगावॅटवर पोहोचला आहे. एक वर्षाच्या अगोदर हा आकडा 1,82,530 मेगावॅटवर राहिला होता. वर्षाच्या आधारावर हा आलेख 8.8 टक्क्मयांनी कमी राहिला आहे.
मे महिन्यांच्या पहिल्या पंधरवडय़ात वीज मागणीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. 1,41,870 मेगावॅटचा पुरवठा होत आहे. तज्ञांच्या मतानुसार वाढती उष्णता आणि चौथ्या सत्रातील लॉकडाऊनमध्ये मिळालेली औद्योगिक क्षेत्रातील शिथिलता यामुळे वीज मागणी वाढली आहे.
नुकसानीचे संकेत
उद्योग मंडळ सीआयआयच्या मागील अहवालानुसार मागणी कमी झाल्यामुळे वितरण कंपन्यांचे 30,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. 50,000 कोटी रुपयापर्यंत रोख व्यवहारात घट येण्याचे संकेत व्यक्त करण्यात येत आहेत.









