राज्य सरकारचे उद्योग, कारखाने यांना निर्देश
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील विविध ठिकाणी तसेच औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योगांतील, कारखान्यांतील कामगार, कर्मचारी यांची थर्मल चाचणी सक्तीची करण्यात आली असून त्याची कार्यवाही सर्व उद्योगांनी, कंपन्यांनी करावी असे निर्देश राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत. त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे राज्य सरकारने जारी केली आहेत. तेथील कामगार, कर्मचारी यांना प्रवासी पास देण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरदिवशी थर्मल चाचणी करून त्यांची नोंद ठेवावी. त्या नोंदीची अचानक अधून मधून तपासणी करण्यात येणार असून मार्गदर्शक तत्वे व इतर नियम अटींची पूर्तता करण्यात यावी. सामाजिक अंतर राखण्यात यावे. पास असल्याशिवाय कोणत्याही वाहनास उद्योग, कारखान्यांच्या ठिकाणी थारा देऊ नये. परप्रांतीय वाहने, माणसे यांना रोखावे, असेही मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात असलेले उद्योग, कारखाने यातील कामगार, कर्मचारी यांचीही थर्मल चाचणी करणे आवश्यक आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी या उपाययोजना करायलाच हव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही. त्याची कार्यवाही न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.









