प्रतिनिधी /सातारा
सध्याचे युग स्पर्धेचे आहे. उद्योगांमध्येही प्रचंड स्पर्धा असून अनेक ठिकाणी युवकांमध्ये उद्योजकता दिसून येते परंतु त्यांना भांडवलाची समस्या जाणवते. त्यामुळेच उस्त्रोगशील युवकांना शासनाने आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्याचा हेतू बाळगला आहे. बॅन्कर्सनी शासनाच्या हेतूचा गांभिर्याने जाणीव ठेवून, फायदेशीर उद्योगांना वेळीच आणि पुरेसे आर्थिक पाठबळ द्यावे. जेथे काही समस्या असतील तेथे आमच्या निदर्शनास आणावे परंतु प्रामाणिक आणि होतकरु उद्योजकाला सहकार्याचा हात दिला गेला पाहीजे, अश्या शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिह्यातील बॅन्कर्स प्रतिनिधीच्या बोलावलेल्या आढावा बैठकीत सूचना केल्या.
व्यवसाय-उदिमाच्या माध्यमातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत हा उद्देशसमोर ठेवून सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱयांच्या जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱयांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेवरुन बोलावलेल्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे बोलत होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अग्रणी बॅंक अधिकारी युवराज पाटील, उद्योग केंद्राचे सातारा जिह्याचे जनरल मॅनेजर उमेश दंडगवाळ, जिल्हा ग्रामिण विकास प्रकल्प संचालक सुषमा देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी लघु-मध्यम-मोठय़ा उद्योगांना वित्तीय पुरवठा करण्याबाबत केलेल्या उदिष्टांचा आढावा घेताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हणाले, जिह्यामध्ये अनेक तरुणांमध्ये टॅलेन्ट आणि इनोव्हेटीव्ह कल्पना आहेत. आण्णासाहेब पाटील आणि अण्णाभाउ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ तसेच उद्योजकता विकास, माविंम, महिला बचत गटांना विविध योजनेव्दारे करण्यात येणारा वित्तीय पुरवठा, जिल्हा उद्योगकेंद्राच्या योजना यांचा पुरेपूर लाभ गरजूंना झाला पाहीजे. बँका एखादा वित्तीय मागणीचा प्रस्ताव नॉट व्हायबल म्हणून नाकारतात त्यावेळी त्याची कारणे देखील त्यांनी नमूद केली पाहीजेत आणि जिल्हा उद्योग केंद्राने अश्या प्रस्तावांच्या उद्योगांना मार्गदर्शन केले पाहीजे.
आज जिह्यातील सामान्य व्यक्तीने इलेक्ट्रीक सायकल विकसीत करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. इंधनावर पर्याय म्हणून इलेक्ट्रीकवर येथून पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे अश्या गरजेच्या परंतु वैशिष्टपूर्ण उत्पादनांसाठी बॅंकर्सनी वित्तीय आधार देताना मागे पुढे पाहीले नाही पाहीजे. प्रसंगी सीएसआर निधीचा सुध्दा शिक्षण आणि प्रशिक्षण याक्षेत्रात वापर केला पाहीजे. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत ऍग्रीकल्चर करीता किती आर्थिक पुरवठा केला जातो हे आम्हाला चांगले माहीती आहे. त्यामुळे अधिक काही बोलण्यापेक्षा शासनाच्या विविध उद्योगविषयक योजनांचा लाभ उद्योजकांपर्यत पोहोचला पाहीजे. जास्तीत जास्त विनंती मागणी अर्जांचा निपटारा करताना आवश्यक ती वित्तीय मंजुरी गतीने दिली गेली पाहीजे. कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च पूर्वी बॅंकांना ठरवून दिलेल्या आणि बँकांनी ठरवून घेतलेल्या उदिष्टांची उदिष्टपूर्ती केली जावी, अश्याही सुचना यावेळी सर्व बँकेचे प्रतिनीधी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी यांना दिल्या.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्य शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र बिंदु मानून होणे ही गरजेचे आहे. उद्योजक घडवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी, असे देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी बैठकीत शेवटी सांगितले.यावेळी सातारा जिल्हयातील राष्ट्रीयकृत, अधिसुचित बॅन्कांचे सुमारे 29 प्रतिनिधी उपस्थित होते.









