यातील कोणीही पॉझिटिव्ह नाही : नियमानुसार इन्स्टिटय़ुशनल क्वॉरंटाईन रहावे लागणार
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
येस बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात जमिनावर असलेले उद्योगपती कपिल वाधवान व त्यांच्याबरोबर आलेले 22 अशा एकूण 23 जणांनी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. याप्रकरणी प्रांताधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात 23 जणांवर वेगवेगळया कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या 23 जणांना कालच पाचगणी येथील सेंट झेवियर्स हायस्कुलच्या इमारतीमध्ये इस्न्टिटयुशनल क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या स्थितीत देशातील नागरिकांसाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. वसई विरार येथील मोठे उद्योगापती कपिल वाधवान व धिरज वाधवान यांचे खंडाळा व महाबळेश्वर येथे मोठ मोठे अलिशान बंगले आहेत. कोरोनाच्या संकटापासुन वाचण्यासाठी हे संपूर्ण कुटूंब खंडाळयाच्या बंगल्यात वास्तव्याला होते. दि. 8 एप्रिल रोजी हे वाधवान कुटूंबातील 9 जण व त्यांच्याबरोबर असलेले नोकर चाकर 14 असे 23 लोक सायंकाळी महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस येथे आले.
ही माहिती तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने याबाबत माहितीची खात्री करून याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कळवले. त्यांनतर जिल्हा प्रशासनाने या सर्वांना पांचगणी येथे इस्न्टिटय़ुशनल क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी गुरूवारी 9 एप्रिल रोजी सकाळी येथे आलेले उद्योगापतीचे कुटूंब पांचगणी येथे हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या.
गुरुवारी सकाळी उद्योगपतींच्या बंगल्यावर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील हे आपले कर्मचारी यांचे समवेत तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे पथक, पालिकेचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व त्यांचे कर्मचारी असा लवाजमा दाखल झाला. सर्व बंगल्यात दाखल झाल्यानंतर पुन्हा बंगला बंद करण्यात आला बंगल्यातील सर्वांची ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव शहा व डॉ. आदर्श नायर यांनी तपासणी केली.
या तपासणीमध्ये कोणालाही कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे आढळली नाही त्यामुळे प्रशासनाचा जीव भांडय़ात पडला. तहसिलदार चौधरी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहितही उद्योगपतीला दिली. काही वेळ उद्योगापतीने फोनाफोनी केला.r परंतु जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल न केल्याने अखेर पांचगणी येथे जाण्याची तयारी सुरू केली. एका तासात सर्व आटोपल्यानंतर सर्व सामान गाडय़ांमध्ये भरण्यात आले. प्रथम पुढे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची गाडी, त्यानंतर रूग्णालयाची रूग्णवाहिका, त्या मागे ओळीने उद्योगपती व त्यांच्या कुटूंबाच्या पाच आलिशान गाडय़ा, त्या मागे पोलीस गाडी व सर्वांत शेवटी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांची गाडी असा वाहनांचा ताफा दुपारी 12 वाजता महाबळेश्वर येथील एका बंगल्यातुन बाहेर पडला.
आता 14 दिवस मुक्काम क्वॉरंटाईनमध्ये
हा ताफा शहरा बाहेरील रस्त्याने हिरडा नाक्यावरून वेण्णालेक व तेथून पांचगणी येथे शासनाच्या खास इमारतीमध्ये पोहचला. याच ठिकाणी उद्योगपतींच्या संपुर्ण कुटुंबाला इस्न्टिटयुशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता पुढील 14 दिवस याच इमारतीमध्ये या उद्योगपतीच्या कुटूंबाचा मुक्काम असेल. या इमारतीला चोहो बाजुंनी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन या इमारतीमधून आता कोणालाही बाहेर पडता येणार नसल्याची माहिती दिली. कितीही पैसा असला तरी कोरोना कोणाला सोडत नाही हे घटनेने समोर आले.
राज्यपातळीवर गदारोळ सुरु झाल्यावर कारवाई
वाधवान उद्योगपतीने खंडाळा ते महाबळेश्वर या प्रवासात कोणाचा अडथळा नको म्हणूण गृहविभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र बरोबर घेतले होते. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटूंब हे माझे खास नातेसंबधातील आहे असा उल्लेख केला होता. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या पत्रामुळे राज्यात एकच खळबळ माजली या एका प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटू लागले. दरम्यान महाबळेश्वर येथे सहलीसाठी आलेल्या वाधवान कुटूंबाने जिल्हाबंदी बरोबर अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरोधात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
मालकांबरोबर नोकरांचीही वरात
शुक्रवारी पहाटे दोन वाजता वाधवान कुटूंबातील कपिल वाधवान वय 46, अरूणा वाधवान 68, वनिता वाधवान 41, टिना वाधवान 13, धिरज वाधवान 40, कार्तिक वाधवान 19, पुजा वाधवान 41, युव्हिका वाधवान 16, आहान वाधवान 7 यांचेसह त्यांचे बरोबर असलेले त्यांचे कर्मचारी शत्रुघ्न घाग 48, मनोज यादव 43, मनोज शुक्ला 45, अशोक वफेलकर 45, दिवानसिंग 48, अमोल मंडल 42, लोहीत फर्नांडीस 33, जसप्रित सिंग 30, जस्टीन डिमेलो 43, इंद्रकांत चौधरी 52, एलिजाबेथ आययापिलाई 42, रमेश शर्मा 42, प्रदिप कांबळे 27 व तारका सरकार 39 या सर्वांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कलम 51 ब , महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे तसेच भादवि कलम 188, 269, 270, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी प्रवासासाठी वापरलेल्या अलिशान पाच गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.








