कोरोनाने अनेकांवर अनपेक्षित आपत्ती ओढवली. या जागतिक संकटांचा सामना सर्वांनाच करावा लागला. आलेले आरोग्यविषयक जागतिक संकट हे जनसामान्यांपासून विशेष व्यक्तीपर्यंत जवळ जवळ समान स्वरुपात उभे ठाकले. रोजंदारी-मजुरी करणाऱयांपुढे दोनवेळची भ्रांत उभी राहिली. लघु-उद्योजकांपुढे मोठे प्रश्न निर्माण झाले तर मोठे उद्योग आणि उद्योगांपुढील विविध समस्याही तेवढय़ाच मोठय़ा स्वरुपात उभ्या ठाकल्या.

या आणि अशा विविध प्रकारच्या विशाल समस्यांची सोडवणूक अनेकांनी व्यक्तिगत व सामूहिक संदर्भात केल्याचे चित्रही साऱया देशानेच नव्हे तर जगानेही पाहिले. कोरोनाचा कालखंड सुरू होताच लक्षावधी गरीब व गरजू लोकांचे रोजगार-व्यवसाय गेले. त्यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने व्यापक व दीर्घकालीन स्वरुपाची मोफत धान्य योजना ज्या पद्धतीने राबविली त्याला तोड नाही. त्याला सामाजिक व सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांची मिळालेली साथ या ठिकाणी उल्लेखनीय आहे.
लघुउद्योग व उद्योजकांपुढे कोरोनामुळे आर्थिक-व्यावसायिक संकटे वेगवेगळय़ा स्वरुपात व मोठय़ा प्रमाणावर उभी ठाकली. त्यावर मात करण्यासाठी लघुउद्योजक सावरले-सरसावले. सुदैवाने त्यांना अर्थमंत्रालय, बँका-वित्तीय संस्था, सरकारचे धोरणात्मक निर्णय इ. ची साथ वेळेत मिळाली व तुलनेने कमी वेळात आपले लघुउद्योगसुद्धा सावरले. याचेच प्रत्यंतर व परिणाम कोरोना काळात मोठे उद्योग-व्यवसाय आणि उद्योगपतींवर तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणावर अपरिहार्यपणे झाले. त्यांच्यावरील व्यावसायिक परिणाम आणि प्रतिक्रिया तेवढय़ाच तीव्र स्वरुपात सुरुवातीच्या टप्प्यात आल्या. उद्योगपतींपैकी राजीव बजाज, किरण मजुमदार-शॉ, प्रशांत भूषण यांनी आपापल्या आकलनानुसार कोरोना आणि त्याचे परिणाम आणि परिणामकारकता यांची कारणमीमांसा करताना केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधानांच्या गेल्या 5 वर्षातील आर्थिक ध्येयधोरणांवर कडाडून टीका करतानाच आपली नैराश्यभावना प्रकर्षाने व्यक्त केली. या साऱया कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या विवंचनाग्रस्त व्यावसायिक पार्श्वभूमीवरील आर्थिक-व्यावसायिक संकटांवर देशातील अधिकांश व आघाडीच्या उद्योगपतींनी केवळ यशस्वीपणे मातच न करता आपापले व्यवसाय क्षेत्र व त्याद्वारे देशाच्या अर्थकारणाला कशाप्रकारे शांतपणे व ठोस स्वरुपात बळकटी दिली ते मुळातूनच अभ्यासण्यासारखे ठरले आहे. ‘फोर्ब्ज’ मासिकाच्या जागतिक स्तरावरील अति श्रीमंताच्या मांदियाळीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा लौकिक रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सातत्याने 13 व्या वषी कायम राखला. एवढेच नव्हे तर वेल्थ हरुन इंडिया रिच लिस्ट-2020 नुसार लॉकडाऊन काळात मुकेश अंबानींच्या श्रीमंतीत दर तासाला सुमारे 90 कोटी रुपयांची भर पडत गेली.
कोरोना काळातील मुकेश अंबानींची विशेष व्यावसायिक कामगिरी म्हणजे त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात पण जागतिक व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे गुगल, फेसबुक, इंटेल यासारख्या कंपन्यांसह रिलायन्सचे व्यवसाय-व्यवहार विषयक करार मोठय़ा निर्धाराने पूर्ण केले.
आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी कोविड-19 असतानासुद्धा हिंडाल्को कंपनीच्या अधिग्रहणाशी संबंधित 20,440 कोटी रु.चे व्यवहार मोठय़ा दूरदर्शीपणे पूर्णत्वास नेले. या व्यवहारात अलेरिया कंपनीशी संबंधित प्रक्रिया अमेरिका, युरोपीय देश व एवढेच नव्हे तर चीनशी पण संबंधित होते. मात्र, ही कामगिरी बिर्ला यांनी मोठय़ा कौशल्याने पूर्ण केली. परिणामी आता बिर्ला उद्योगातील ही कंपनी जगातील सर्वात मोठी ऍल्युमिनियम उत्पादक कंपनी ठरली आहे. वैयक्तिक संदर्भात कुमारमंगलम बिर्ला यांच्याबद्दल असे सांगितले जाते, की त्यांच्या सुमारे 20 वर्षांच्या व्यावसायिक-उद्योजक म्हणून असणाऱया सफल कार्यकाळात ते केवळ 3 वेळा वैतागले होते. आपल्या स्वभाव-वैशिष्टय़ाचे हे ‘कूल’ वैशिष्टय़ त्यांनी कोरोना काळात पण कायम ठेवले हे विशेष.
कोरोना काळात पण गौतम अदानी यांनी एअरपोर्ट ते पोर्ट या मूलभूत व महत्त्वाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. यामध्ये देशांतर्गत सर्व प्रमुख विमानतळांचे संचालन-व्यवस्थापन करण्यापासून त्यांच्या अदानी पोर्ट्सने आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम पोर्टचे व पर्यावरणपूरक व्यवसायात 45 हजार कोटींचा नवा व्यवसाय सुरू करणे हे त्यांचे कोरोना काळातील विशेष धोरणात्मक निर्णय म्हणावे लागतील. आपल्या विशेष व्यावसायिक स्वभाव वैशिष्टय़ांसाठी असणारे कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी कोरोनानंतर उत्पादन क्षेत्राचे चीनमधून भारतात होणारे स्थलांतर अपरिहार्य व भारताच्या संदर्भातच नव्हे तर जागतिक संदर्भातही महत्त्वपूर्ण ठरण्याचा मुद्दा मांडला. उदय कोटक यांच्या या आणि अशा व्यापक व्यावसायिक धोरणामुळेच कोरोना काळात केंद्र सरकारने एक मोठा व्यावसायिक निर्णय म्हणून उदय कोटक यांची आयएल अँड एफएसचे गैर प्रशासनिक अध्यक्ष म्हणून फेरनिवड केली. याशिवाय सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची इंडो-ब्रिटन टेझरीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याचा दुहेरी मान त्यांना मिळाला. कोरोनाची सुरुवात होताच टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी 500 कोटींची मदत जाहीर केली व पुढे त्यात आणखी 100 कोटींची भर घालून लगेच पूर्तता पण केली. याशिवाय टाटा समूहाच्या कोरोनाविषयक ध्येयधोरण आणि कार्यप्रणालीला मूर्त रूप देण्याचे महनीय काम पण रतन टाटांनी स्वतः केले.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘पीएम केअर्स’ या मदतनिधीला 100 कोटी मदत दिली. त्याशिवाय जिंदाल स्टीलचा विविध कारखाने आणि आस्थापनांचा उपयोग कोविड-19 च्या रुग्णांसाठी करून दिला. त्याद्वारे शेकडो रुग्णांवर उपचार तर झालेच शिवाय 4 लाख गरजूंची भोजन व्यवस्था जिंदाल समूहाद्वारे लॉकडाऊन दरम्यान करण्यात आली. या व्यावसायिक योगदानाशिवाय कोरोनादरम्यान सज्जन जिंदाल यांनी आपला दैनिक व्यायाम आणि चालण्याची प्रक्रिया घरी जारी ठेवली.कोरोनाकाळ अनेकांसाठी अनेकार्थांनी कसोटीचा ठरला. व्यक्तीगतपासून व्यावसायिक स्तरावर सर्वांनी त्यावर तोडगा पण काढला. आकस्मितपणे आलेल्या या महासंकटांवर मात करण्याच्या प्रक्रियेत शासन-समाज या उभयतांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना उद्योग आणि उद्योगपतींनी जी साथ दिली ती प्रातिनिधिकच नव्हे तर परिणामकारक ठरली. याच निमित्ताने उद्योग-व्यवसायाची नाळ गरजू व्यक्तींशी अधिक घट्टही झाली.
दत्तात्रय आंबुलकर








