आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सोमवार दि. 8 मार्चपासून प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्य केंद्रे, तालुका इस्पितळ, जिल्हा इस्पितळांसह एकूण 3 हजार केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
कोरोना नियंत्रणासंबंधी आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळै बैठक घेऊन अधिकाऱयांशी चर्चा करण्यात आली आहे. सोमवारपासून राज्यातील 3 हजार केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना लस घेणे सुलभ होणार आहे, असे ते म्हणाले.
बेंगळूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दररोज 200 ते 250 कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहे. शुक्रवारी 44 रुग्ण आढळले. शहरात 12 क्लस्टर निश्चित करण्यात आले आहे. तेथे आतापर्यंत दिवसाला 30 हजार कोविड चाचण्या केल्या जात होत्या. आता हा आकडा 40 हजारपर्यंत वाढविण्यात येईल. कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येणाऱया भागातील संसर्गबाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱयांचा शोध घ्यावा लागणार आहे. यापूर्वीप्रमाणे एका बाधितांच्या संपर्कात येणाऱया किमान 20 जणांच शोध घेण्याची सूचना राज्य दौऱयावर आलेल्या केंद्रीय पथकाने दिली आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात येणाऱयांचा शोध घेऊन कोविड चाचणी करण्यात येईल, असेही सुधाकर यांनी सांगितले.
एकत्र जमणे महिनाभर टाळणे गरजेचे
केरळ आणि महाराष्ट्रात बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यातही रुग्णवाढीचा धोका अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातून येणाऱयांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. यापुढे गटागटाने वावरणे, एकत्र जमण्यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सभा, समारंभ, आंदोलनांमध्ये किमान एक महिना तरी अधिक जणांनी सहभागी होण्यासापासून दूर रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. सार्वजनिक समारंभांमध्ये 500 पेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नयेत. गृहखात्याकडून कारवाईची प्रक्रिया कठीण होण्यासाठी सूचना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
खबरदारी आवश्यक
कोरोनाचे सक्रिय रुग्ण अधिक असणाऱया जिल्हय़ांच्या प्रशासनांशी मुख्यमंत्री येडियुराप्पा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. मंगळूरमध्ये परराज्यातून येणाऱयांची संख्या अधिक असून त्यांची तेथेच तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. बेंगळूर शहर, बेळगाव, मंगळूर, म्हैसूर, चामराजनगर, उडुपी, कोडगू, तुमकूर या जिल्हय़ांमधील नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.









