केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते उद्घाटन
प्रतिनिधी/ पणजी
’लोकशाही उत्सव’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राष्ट्रीय महिला संसदेचे उद्या दि. 8 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. एकूण पाच दिवसांच्या या उत्सवात राष्ट्रीय युवा, राष्ट्रीय महिला आणि राष्ट्रीय पंचायत संसद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यात राज्यभरातील लोक सहभागी होणार आहेत.
बांबोळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिला नेतृत्व तयार व्हावे, महिलांसाठी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर असलेल्या विविध संधी तसेच कार्याची माहिती त्यांना मिळावी, त्यांच्यातील कलागूण, कौशल्यास वाव मिळावा, त्यातून व्यवसाय, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्या, चर्चा-वक्तृत्वगूण विकसित व्हावे या हेतूने महिला संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा संसद आणि पंचायत संसद यांच्या आयोजनामागेही हाच हेतू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य विधानसभा आणि एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांच्या महिला संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी अन्य मान्यवरांमध्ये केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री विश्वजित राणे, जेनिफर मोन्सेरात, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार विनय तेंडुलकर आदींची उपस्थिती असेल.
आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त प्रवेशिका
महिला संसद कार्यक्रमात सहभागासाठी गोवा तसेच गोव्याबाहेरून आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या असून त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमासाठी अद्याप ऑनलाईन नोंदणी सुरूच असून थेट सहभागी होणे शक्य आहे अशा महिलांनी हजेरी लावावी, तसेच शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वैविध्यपूर्ण विषयावरील चर्चासत्रे, संवाद आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या महिला बालविकास, ग्रामीण विकास, उच्च शिक्षण, क्रीडा संचालनालय यासारख्या अनेक खात्यांनी विशेष परिश्रम घेऊन उत्कृष्ट आयोजन करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याशिवाय नेहरू युवा केंद्र, एनसीसी, एनव्हायके, एनएचएच, जेसीआय तसेच रोटरी, लायन्स क्लब, सम्राट क्लब यासारख्या अन्य विविध संघटना, सांस्कृतिक गट, पथनाटय़ गटही सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात विविध कलाकार तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे सत्कार, पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले.
पाच दिवशीय लोकशाही उत्सवात थाटण्यात आलेल्या अनेक स्टॉल्सच्या माध्यमातून राज्य तसेच केंद्र सरकाच्या विविध खात्यांची कार्यशैली, त्यांच्या योजना, कलाकुसर, आदी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न होतील. त्याशिवाय स्वयंसेवा गटांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यात सहभागी होणे लोकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.









