संप यशस्वी करण्याचे कर्मचारी संघटनेचे आवाहन : संपाबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध
प्रतिनिधी/ बेंगळूर
सातव्या वेतन आयोगाची शिफारशी होईपर्यंत 40 टक्के अंतरिम भरपाई मिळावी. तसेच नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 1 मार्चपासून सेवेतून गैरहजर राहून संप यशस्वी करण्याचे आवाहन सर्व कर्मचाऱ्यांना केले आहे. या संदर्भात सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष षडाक्षरी यांनी सोमवारी संपाबाबत काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या असून त्यानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी 1 मार्चपासून अनिश्चित काळासाठी सेवेतून गैरहजर रहावे. याचबरोबर सरकारने कायदेशीर कारवाई करण्याचा पुढाकार घेतल्यास त्याला न घाबरता संप सुरूच ठेवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
संपादरम्यान कोणतेही आंदोलन छेडून घोषणाबाजी न करता शांततेत गैरहजर राहण्याद्वारे संप सुरू ठेवण्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी आरोग्य खात्यासह सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांचे मन वळवून ते सरकारी कार्यालयात हजर राहू नयेत याची दखल घ्यावी. आरोग्य खात्यातील आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांनाही काळे पट्टी बांधून कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संपादरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याने गोंधळ निर्माण होईल यापद्धतीने माध्यमांशी संवाद साधू नये. सर्व कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहेत.









