ऑनलाईन टीम / बिकानेर :
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. 45 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना डोअर-टू-डोअर लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारपासून ही मोहीम सुरू होणार असून,डोअर-टू-डोअर लस देणारे बिकानेर हे देशातील पहिले शहर असणार आहे.
डोअर-टू-डोअर लसीकरणासाठी मोबाईल टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी हेल्पलाईन क्रमांकाद्वारे नोंदणी करायची आहे. नोंदणीशिवाय लस दिली जाणार नाही.10 लोकांची नोंदणी झाल्यानंतरच लसीची व्हॅन लोकांच्या घरी जाईल. कारण एका वायलमधून 10 लोकांना लस दिली जाते. दहापेक्षा कमी लोक असतील तर उरलेला डोस खराब होण्याची शक्यता आहे.
या मोहिमेसाठी वैद्यकीय कर्मचारीही नेमण्यात आले असून, लस घेणाऱ्यांच्या निरीक्षणासाठी काही काळ ते लस घेणाऱ्याकडे राहतील.









