सोशल मीडियावरून मिळतेय स्वकीयांच्या मृत्यूची माहिती
युक्रेनवर रशियाचा हल्ला 33 व्या दिवशीही सुरूच आहे. हल्ल्यात युक्रेनच्या 1,119 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. युक्रेनच्या मारियुपोल शहरातील स्थिती अत्यंत बिकट आहे. मृतदेहांना दफनभूमीत नेणेही अवघड ठरल्याने अम्यूजमेंट पार्क, क्रीडांगणे आणि घरासमोरील अंगणातही दफन करावे लागत आहेत. हल्ल्यांमध्ये दूरसंचार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे अन्य देशांमध्ये राहणाऱया लोकांना स्वकीयांची माहितीही मिळविणे अवघड ठरले आहे.
युक्रेनमध्ये काम करणारे लोक मृत्युमुखी पडणारे आणि शहर सोडणाऱया नागरिकांची यादी दरदिनी तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत. अनेक लोकांना स्वतःच्या स्वकीयांच्या मृत्यूची माहिती कब्रचे छायाचित्र पाहून मिळाली आहे. पोलंडमध्ये आश्रय घेतलेल्या कीव्हच्या ओलेना मॅकाय यांना स्वतःच्या भावाच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावरून माहिती मिळाली. सर्च फॉर रिलेटिव्हज अँड प्रेंड्स अन्य लोकांसाठी माहिती पुरवत आहे.

दफनभूमीपर्यंत पोहोचणे कठिण
रशियाच्या बॉम्बवर्षावात लोकांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह दफनभूमीपर्यंत नेणे लोकांना अवघड ठरले आहे. यामुळे शाळांच्या मैदानातच मृतदेह दफन केले जात आहेत. मारियुपोलमधून बहुतांश लोक बाहेर पडू इच्छितात परंतु बाहेरील मदतीशिवाय हे शक्य नाही. वाहन चालविण्यासाठी सध्या चालकही उपलब्ध नाही. स्थलांतरात मदत करणाऱया एका संस्थने एकेदिवशी 100 चालकांची मदत मागितली, परंतु केवळ 30 चालकच उपलब्ध झाले.
रशियाकडून नागरिकांवर बळजबरी
रशियाचे सैन्य युक्रेनच्या नागरिकांचे पासपोर्ट आणि ओळखपत्र काढून घेत त्यांना बळजबरीने रशियाच्या सीमेत पाठवत असल्याचे मारियुपोलच्या लोकांचे सांगणे आहे. आतापर्यंत सुमारे 3 हजार लोकांना रशियात नेण्यात आले आहे. तसेच या लोकांना रशियन ओळखपत्रेही देण्यात येत आहेत. रशियाचे सैन्य युक्रेनच्या लोकांना मदत केल्याचा खोटा देखावा उभा करू पाहत आहे.









