सायकल ट्रक असून अडचण नसून खोळंबाची अवस्था, कंत्राटदाराचे साफ दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग-अनगोळ या रस्त्यावरील पदपथ आणि सायकल ट्रकची अवस्था गंभीर बनली आहे. या ट्रकवरच विद्युतखांब असून गवत, झाडे वाढली आहेत. त्यामुळे ही पदपथे कुचकामी ठरू लागली आहेत. यातच अनेक व्यावसायिकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजना राबवूनही कुचकामी ठरताना दिसू लागली आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. मुदत संपूनदेखील त्या कामांकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून सर्वच कामे अर्धवट झाली आहेत. वास्तविक तातडीने कामे पूर्ण करणे गरजेचे होते. याचबरोबर नागरिकांना ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले आहेत. असे असताना त्यावर झाडेझुडुपे वाढली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणायचे की दुसरे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सायकल ट्रकमध्ये पाण्याचा चेंबर फुटून पाणी वाया जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनगोळ-उद्यमबाग नाक्मयावरील पदपथावर गवत उगवले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. या पदपथावर पानपट्टी व चहाच्या टपऱया थाटण्यात आल्या आहेत. याचबरोबर व्यावसायिकांचे जाहिरात फलकदेखील उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे पदपथावरून ये-जा करणे कठीण बनत आहे.
अन्यथा स्मार्ट सिटी कागदावरच
सध्या तरी सायकल ट्रकचा कोणीच उपयोग करताना दिसत नाही. त्यामुळे केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. केवळ नियोजन आणि आराखडा करून त्याचा काहीच उपयोग झाला नाही तर त्याबाबत योग्य मार्गदर्शन करून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा स्मार्ट सिटी कागदावरच राहणार आहे.