अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे आवाहन
प्रतिनिधी/ चिपळूण
उद्ध्वस्त चिपळूण पाहिल्यानंतर आता राज्यच नव्हे तर देशातील जनतेने या नगरीच्या उभारणीसाठी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी यथाशक्ती जी लहान -मोठी देता येईल तेवढी मदत द्या, असे आवाहन अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी येथे ‘तरुण भारत’शी बोलताना केले.
महापूर ओसरल्यानंतर राजकीय नेते, मंत्र्यांचे दौरे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सुरू झाले आहेत. यामध्येच बुधवारी सायंकाळी कोणताही गाजावाजा न करताच अभिनेत्री मातोंडकर यांनी शहरातील बाजारपेठेची पाहणी केली. नुकसानग्रस्त व्यापाऱयांच्या व्यथा जाणून घेतल्या. काही ठिकाणी त्यांनी आर्थिक मदतीसह जीवनावश्यक साहित्य, महिलांना आवश्यक असणाऱया गोष्टींचे वाटप केले. यावेळी त्या म्हणाल्या, मी चिपळूणच्या महापुराचे फोटो प्रथम कलकत्त्याला असताना पाहिले. ती दृष्ये भयानक होती. आज येथे आल्यानंतर ते प्रत्यक्षात पाहत आहे. येथे येण्याचे प्रमुख कारण फक्त पूरग्रस्तांना धीर देणे, एवढेच होते. एका रात्रीत घरदार उद्ध्वस्त झाली असून अशांना आपण करू तेवढी मदत थोडीच आहे. मी स्वतः सेवादलातून वेगवेगळया गोष्टीवर काम करत आले आहे. विविध सामाजिक संस्थांनीही आता मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. वाचनालयांचे झालेले नुकसान तर कधीही भरून न येणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.









