प्रतिनिधी/करमाळा
उद्धव ठाकरे हे नाममात्र मुख्यमंत्री असून त्यांचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे. या सरकारच्या खुर्चीला तीन पाय असल्यामुळे सरकारचा कारभार खिळखिळा झाला असल्याची खरमरीत टीका खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाना साधला.
यावेळी बोलताना खा. निंबाळकर म्हणाले की, या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. असून राज्यातील आठ कोटी शेतकरी उध्वस्त झाले आहेत. विधानसभेत वीज तोडणार नाही अशी घोषणा करायची आणि नंतर लगेचच अधिवेशन संपताच वीज तोडणी सुरू करायची हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. लॉकडाऊन च्या काळात शेतकरी उध्वस्त झाला ,शेतात उत्पन्न झालेला अब्जावधी रुपये शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला, अशा काळातील वीजबिल वसुली केली जात आहे. आज गावच्या गाव अंधारात आहेत, तरी या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांचे हित लक्षात येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही कारण ते शरद पवारांच्या इशार्यावर राज्याचा कारभार करतात.
राठोडांना एक तर मंत्री धनंजय मुंडेंना वेगळा न्याय
संजय राठोड यांना एक न्याय व धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय देण्यात आला. राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्यामुळे हे सगळे घडत आहेत. धनंजय मुंडे वर या प्रकरणात कारवाई केली तर राष्ट्रवादीच्या सर्वच नेतेमंडळींच्या अशी प्रकरणे आहेत सर्वांनाच राजीनामा द्यावा लागेल असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व निवडणुकात समविचारी लोकांना बरोबर घेऊ
सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी पार्टी लढवणार असून वेळ प्रसंगी समविचारी लोकांना आम्ही बरोबर घेऊ. राज्यातील सत्ता नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास व भाजपचा पारदर्शक कारभार यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला चांगले यश मिळाले आहे. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्याला अधोगतीला नेत असुन लवकरच महाराष्ट्रात सत्ता बदल होईल असा विश्वास व्यक्त केला.
भाजपची सोलापूर जिल्ह्यातील ताकद कमी झाली या प्रश्नावर बोलताना निंबाळकर म्हणाले की भाजपची ताकद कमी झालेली नाही, सत्ता नसली तरी कार्यकर्ते जिद्दीचे आहेत व आमची संघटना व आमचे कार्यकर्ते येणाऱ्या काळात भाजपची ताकद दाखवून देतील.
उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाताळता राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष देशमुख, तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल ,अमरसिंह साळुंखे, काका सरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleदरोडेखोर निघाले वीट भट्टीतील कामगार
Next Article सांगली : शंभर फुटी रोडवर मंडप गोडावूनला आग









