मुंबई/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शुवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यांचं नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे अनेकांना आपले भाऊ, मुलगा वाटत आहेत. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख वाटणे त्यांचं यश आहे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत असं सांगत उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करण्यासठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली तसंच इतर जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शरद पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत जाहीर केली. तसेच यावेळी शरद पवारांना संजय राऊतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे”.
“मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन केलं आहे. ते राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत, मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत. आजच्या दिवशी हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. आणि ते देशाचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.








