विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 9 उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्याची खेळी होती. काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतल्याने आता उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित राहिले आहे.
कोरोनाचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात सुरू असताना दुसरीकडे गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच गाजत होते. त्याला कारणही तसेच होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले होते. 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. 9 जागांसाठी 9 उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित ठेवण्याची खेळी होती. मात्र, काँग्रेसने ऐनवेळी 2 उमेदवार दिल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नंतर काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतल्याने आता उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित राहिले आहे.
21 मे रोजी होणाऱया विधानपरिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन उमेदवार एक राजेश राठोड व दुसरे राजकिशोर मोदी यांचे नाव जाहीर केले. काँग्रेसकडे 44 आमदार असून विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 29 मतांची गरज होती. म्हणजे काँग्रेसकडे 15 मते अधिक उरतात. दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अधिकची 14 आमदारांची गरज होती. याचा अर्थ ही 14 मते मिळविण्यासाठी काँगेसला घोडेबाजार केल्याशिवाय पर्याय नव्हता, हे स्पष्ट होते. मात्र, ठाकरे यांना घोडेबाजार नको होता. असे घडणारच असेल तर आपण निवडणूक लढणार नसल्याचा इशारा ठाकरे यांनी देताच काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतला. त्यामुळे आता महाविकास आघाडी 5 जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता या 9 जागांसाठी जे उमेदवार दिले आहेत, त्यांचा विचार करता भाजपने जे उमेदवार जाहीर केले आहेत, त्यावरून भाजप नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका होत आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. भाजपने ज्या 4 जणांना उमेदवारी दिली आहे, त्यातील 2 उमेदवार हे इतर पक्षातून आलेले आहेत.
रणजितसिंह मोहीते-पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी विधानपरिषद आमदार आणि राज्यसभा खासदार. मोहिते पाटील यांनीदेखील एकही निवडणूक लढविलेली नाही. दुसरे उमेदवार गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते. गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगलीतून लढविली होती. मात्र, भाजपच्या संजयकाका पाटील यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच पडळकरांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली होती. मी काय माझा भाऊ जरी भाजपातून उभा राहिला तरी बिरोबाची शपथ घेताना भाजपला मतदान न करण्याचे आवाहन याच पडळकरांनी केले होते. नंतर हेच पडळकर भाजपात गेले. बारामती विधानसभा निवडणूक लढविली सर्वात अधिक धनगर समाज असणाऱया बारामतीत पडळकरांची बिरोबाची शपथ घेतलेली व्हीडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आणि पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले. आता भाजपने पडळकरांना आमदारकी दिल्यानंतर भाजपासोबत असलेले महादेव जानकर हे दुरावण्याची शक्यता आहे. भाजपने नवख्या चार उमेदवारांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी कायम आहे. खडसे यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करताना लॉकडाऊन संपल्यानंतर आपण निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर करताना सातारा जिल्हय़ातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा राज्यात आक्रमक प्रचार करणाऱया अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीला झालेला पराभव हा खुद्द शरद पवार यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे राज्यात नव्हे देशात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यानंतरही शरद पवार साताऱयात हा विजय साजरा करण्यासाठी केवळ शिंदेंचा पराभव झाल्याने आले नव्हते. त्यामुळे शिंदेंचे विधानपरिषदेवर राजकीय पुनर्वसन होणार हे नक्की होते.
भाजपमध्ये सध्या निष्ठावंताना डावलले जात असल्याबद्दल मोठी नाराजी आहे. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये आलेल्या आयारामांमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतरही आज भाजप पुन्हा एकदा आयारामांसाठीच पायघडय़ा घालताना दिसत आहे. मात्र, राजकारणाचा विचार करता भाजपला अन्य पक्षातून आलेल्यांना संधी देणे आणि त्यांना टिकवणे हे मोठे आव्हान आहे. कारण भाजप आज महाविकास आघाडी या तीन पक्षाच्या सरकारशी एकटा लढत आहे. त्यातच भाजपने सरकारवर प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, शांत, संयमी ठाकरेंनी भाजपचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. त्यातच मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना विरुद्धचा लढा लढताना राज्यातील जनतेच्या मनात आपली जी प्रतिमा निर्माण केली आहे, ती पाहता आणि महाविकास आघाडीतला समन्वय बघता भाजपला पक्षात आलेले आयाराम टिकवणे मोठे आव्हान आहे. त्यातच जर गळती लागली तर ती रोखणे कठीण आहे. त्यामुळे फडणवीस यांनी निष्ठावंताना डावलले असावे. कारण भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यापैकी विधान परिषदेवर असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आज पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडताना दिसतात. कोरोनाच्या मदत कार्यात पुढाकार घेताना दिसतात. मात्र निष्ठावंत असलेले भाई गिरकर कुठे दिसत नाहीत. पालघर हत्याकांड असो किंवा कोरोना विरोधात सरकारच्या विरोधात दरेकर आणि प्रसाद लाड किंवा राम कदम हे नेहमीच आघाडीवर दिसले. अपवाद आहे तो किरीट सोमय्यांचा. मात्र, सोमय्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. आज भाजपला विरोधी पक्षात राहणे हे अवघड आहे. त्यातच एकीकडे सोशल मीडियावर भाजपला चांगले ट्रोल केले जात आहे, तर दुसरीकडे पक्षाच्या भूमिकेमुळे टीका होत आहे. त्यामुळे भाजपसमोर सरकारच्या विरोधात लढण्याबरेबरच नेटकरी आणि स्वपक्षातील लोकांचा असा सगळ्य़ांशी सामना करावा लागत आहे.
प्रवीण काळे








