(अध्याय सातवा)
निराभिमानी मनुष्याचा जरी वेगवेगळय़ा स्वार्थ साधू पाहणाऱया लोकांशी संबंध येत असला तरी त्याचे चित्त पालटत नाही ही खरी शांती. तो सर्व प्राण्यांचा सखा, सर्व लोकांचा आवडता, सर्वांचा सुहृद होतो. भगवंत पुढे म्हणाले, असे सर्वांशी त्याचे मैत्रीचे आश्चर्यकारक नाते जडायचे कारण म्हणजे त्याच्या वागण्यात स्वार्थाचा लवलेश नसतो. मी जसा कोणताही भेदभाव न करता जगातील सर्वांकडे एकाच नजरेने पहात असतो तसा निराभिमानी माझ्या नजरेनेच जगाकडे पहात असतो उद्धवाला भगवंतांचे सांगणे मनोमन पटले पण त्याला हेही माहीत होते की, भगवंतांचे म्हणणे कितीही उपयोगाचे आणि आचरणीय असले तरी सामान्य माणसाच्या गळी उतरणे कठीण! म्हणून तो पुन्हा सांगतो, भगवंता! ज्याच्या मनात काम आहे, ज्याची बुद्धी विषयासक्त झालेली आहे त्याच्या हातून त्याग घडणे शक्मय नाही. मला मोक्ष प्राप्तीसाठी तू त्यागाचे आणि संन्यासाचे महत्त्व सांगितलेस, पण त्याग अति कठीण आणि परम दारुण आहे. श्रीकृष्णा ज्याच्या मनात काम आहे, ज्याची बुद्धी विषयासक्त झाली आहे, त्याच्या हातून कधीही त्याग घडणे शक्मय नाही. म्हणून प्रपंचात आसक्त झालेले भक्त तुला विन्मुख होतात. त्यांचे चित्त सदासर्वकाळ अस्थिर आणि दूषित झालेले असते. कारण तुझी माया ही विचित्र उपाधी आहे त्यामुळे मी, माझे ही वृत्ती फार वाढते. मग बुद्धी मूढ बनते व घरादारावर अतिशय असक्ती जडते. मग कुठला आलाय त्याग? ती बुद्धी निर्मळ होईल असे काही तरी सांग. म्हणजे मग आम्हाला आत्मस्वरूपाचे आकलन होईल व आम्ही संसार यातनातून मुक्त होऊ. संसार ही एक अंधारी विहीर आहे. त्यामध्ये काम, क्रोध, मोह, लोभ इत्यादी सर्प आहेत. निंदा व स्पर्धा यांचे दाट काटे पसरले आहेत. यातून बाहेर पडायचा उपाय काही मला सुचत नाही, तरी हे कृपानिधे मला आत्मज्ञान देऊन वर काढ. यावर भगवंत म्हणाले, तू आपणहून सावध हो! कारण मृत्यूलोकी जन्म घेऊन स्वतःच स्वतःचा उद्धार करता येतो. परमार्थाला माता, पिता, बंधू, भगिनी वा इतरेजन सहाय्य करू शकत नाहीत. जो स्वदेहामध्ये विवेकी असतो तोच आपला उद्धार करून घेतो. चांगले काय, वाईट काय हे कळावे म्हणून मी माणसाला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर करून तो विचार करू शकतो व चांगले आचरण करून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. यासाठी प्रारब्धानुसार जी काही चांगली वाईट परिस्थिती असेल त्यामध्ये मी चांगलेच वागणार असे मनाशी ठरवून तो त्याप्रमाणे वागू शकतो. कारण कोणत्याही प्रसंगात चांगले वागायचे की, दुष्टपणा करायचा हे ठरवायचे स्वातंत्र्य मी माणसाला दिले आहे. एकदा चांगले वागायचे ठरवले की, त्याने सतत माझ्या अनुसंधानात रहावे. माझ्या सतत चिंतनाने त्याच्या हातून गैरवर्तणूक होणार नाही व त्याचा उद्धार होईल. भगवंतांनी मनुष्य जन्मामध्ये माणूस आपला आपण उद्धार कसा करून घेऊ शकेल याची मुख्य युक्ती सांगितली. ती म्हणजे त्यांच्यावर दृढविश्वास आणि सतत त्यांचे चिंतन. आता ती प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पुढे सांगणार आहेत.







