अध्याय बाविसावा
एकविसाव्या अध्यायात भगवंतांच्याकडून वेदार्थातील सारांशाचे निरूपण ऐकून उद्धवाच्या लक्षात आले की, वेदवाणीवरून ब्रह्म हे एकच आहे आणि स्वानुभवाने पाहिले असताही ते तसेच दिसते. ते परिपूर्ण असून अद्वैतरूपानेच राहिलेले आहे. असं जरी असलं तरी, मोठमोठे ज्ञाते ऋषि तत्वे अनेक आहेत असे सांगतात. हे कसे शक्मय आहे हे भगवंतांच्याकडून जाणून घ्यावे या विचाराने उद्धवाने प्रश्न विचारण्यास आरंभ केला.
वास्तविक पाहता तत्व एकच आहे हे भगवंतांनी आधीच सांगितलं होतं आणि उद्धवाला ते पटलंही होतं. त्यानुसार ‘मी ब्रह्मस्वरूप झालो’ असे जर उद्धवाने मान्य केले असते, तर आता सर्व सांगून झाले असे म्हणून श्रीकृष्ण निजधामाला जातील असे त्याला वाटत होते. मग हे दर्शन आपल्याला कसे होणार? असा प्रश्न त्याला पडला. भगवंत आपल्याला सोडून जाणार या कल्पनेने तो काकुळतीला आला. तो क्षण होताहोईतो पुढे ढकलावा या विचाराने मनात कोणताही संशय नसतानाही त्याने वर सांगितलेला प्रश्न भगवंतांना विचारला. संभाषण पुढं चालू ठेवण्यासाठी नवनवीन प्रश्न विचारत राहून भगवंतांना बोलण्यात गुंतवले पाहिजे असा उद्धवाचा हेतू हा प्रश्न विचारण्यामागे होता. आपला वियोग होऊ नये म्हणून नवनवीन प्रश्न विचारण्याची उद्धवाची युक्ती भगवंतांच्याही लक्षात आली होती.
गंमत म्हणजे भगवंतांनाही उद्धवाला सोडून जायची इच्छा होत नव्हती म्हणून उद्धवाचा प्रश्न ऐकून त्यांनाही सुख आणि समाधान वाटले. वास्तविक पाहता उद्धव व आपण एकच आहोत, वियोगाचे दुःख हे मिथ्या आहे, हे उद्धवाला समजेपर्यंत आपण याच्या प्रश्नांची उत्तरे देत राहुयात असा विचार त्यांनी केला. या विचारातून ह्या बाविसाव्या अध्यायामध्ये तत्त्वांची एकंदर संख्या किती, हे ते अवश्य दाखवून देणार आहेत. प्रकृतिपुरुषाचा विचार व जन्ममरणाचा प्रकारही सांगतील. आत्मा एकच आहे की, अनेक आहेत हे कळावे, तसाच तत्त्वसंख्येचा विचारही कळावा या हेतूने उद्धव म्हणाला, हे विश्वात्मका, विश्वेश्वरा, हे विश्वधारका, विश्वंभरा, हे विश्वसाक्षी, विश्वाकारा, हे विश्वसुंदरा श्रीकृष्णा! जड-मलिन-अज्ञानता ह्या ज्या मायेमुळे होतात त्या मायेचाही तू नियंता आहेस. हेच तुझे अगाध ‘प्रभुत्व’ होय. तेव्हा तू सांगतोयस तो एक तत्वविचार योग्यच असणार! याआधी एकोणिसाव्या अध्यायामध्ये तुम्ही तत्त्वांची गणना करून ती सारी अठ्ठावीस आहेत असे सांगितलेत. त्याप्रमाणे प्रकृती, पुरुष, महत्तत्व व अहंकार आणि श्रे÷ अशी पंच महाभूते मिळून नऊ तत्त्वे झाली. दहा इंद्रिये, अकरावे मन, पाच विषय आणि तिन्ही गुण मिळून अठ्ठावीस संख्या आहे हे मला समजले पण तपःसामर्थ्याने महासमर्थ, भूतभविष्य जाणणारे असे जे मोठमोठे ऋषिवर्य आहेत, त्यांनी काढलेली तत्त्वांची संख्या मला बुचकळय़ात टाकणारी आहे कारण ते ती वेगवेगळय़ा प्रकारची सांगतात! हे कसं शक्मय आहे ते मला समजत नाही.
काहीजण सव्वीस तत्त्वे सांगतात, तर दुसरे काहीजण पंचवीस, काहीजण सात, नऊ किंवा सहा म्हणतात काहीजण चार सांगतात, तर काहीजण अकरा! काहीजण सतरा, काहीजण सोळा, तर काहीजण तेरा सांगतात. म्हणून भगवंता तू कृपा करून या ऋषींचे म्हणणे मला उलगडून सांग. तू निजात्मरूपी परमेश्वर आहेस. तुला जाणण्यासाठी मोठमोठय़ा ऋषींनी नानाप्रकारचे तर्क चालवून तत्त्वविचार सांगितला आहे. तू तर एकच तत्त्व आहे असे सांगितले आहेस. ऋषि म्हणतात ती अनेक आहेत. तेव्हा यांतील निश्चितार्थ मला सांगावा. उद्धवाच्या प्रश्नावर भगवंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, उद्धवा, मोठमोठय़ा ऋषींनी जी तत्वे सांगितली आहेत ती सारी खरीच आहेत. हे सर्वज्ञ ज्ञात्यांना माहीत आहे. ज्याचे ज्ञान जसे असते, त्याप्रमाणे तो तत्त्वे सांगत असतो. हे लक्षात घेऊन ऋषी बोलतात तेही खरेच समजावे. आता सारीच मते जर खरी असं म्हणायचं झालं, तर कोण चूक? कोण बरोबर हे ठरवण्याचं कामच उरत नाही असे मात्र उद्धवा! तू म्हणू नकोस. मी असं म्हणतोय त्यामागचं हृद्गत मी तुला सांगतो ते ऐक.
क्रमशः








