पणजी :
पणजी महापौरपदी पुन्हा विद्यमान महापौर उदय मडकईकर यांची निवड करण्यात आली असून उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मनपाचे आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांनी काल गुरुवारी महापौर व उपमहापौर यांच्या निवडीची घोषणा केली. दोघानीही कालच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
महापौरपदी पुन्हा एकदा निवड झाल्याने आपण पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात तसेच सर्व नगरसेवकांचा आभारी आहे. पणजी मनपाला देशातील पहिल्या 50 महानगारपालिकांत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पालिका ‘पीपल्स पेंडली’ बनविणार आहे. पणजीच्या लोकांची सर्व प्रशासकीय कामे वेळेवर पूर्ण केली जाणार आहेत, असे महापौर उदय मडकईकर यांनी महापौरपदी दुसऱयांदा निवड झाल्यावर सांगितले.
आमदार बाबुश मोन्सेरात यांचा दृष्टिकोन पुढे नेऊन पणजीच्या विकासासाठी काम करणार आहे. गेले वर्षभर पाणजीच्या विकासाची अनेक कामे केली आहेत. पणजी प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त करणे, पणजीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाय केले आहे. पणजीतील लोकांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी काम करणार आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. पणजीच्या विकासात आमदर बाबुश मोन्सेरात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे सहकार्य लाभले आहे. सर्वाच्या सहकार्याने पणजीचा विकास केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
महापौराच्या सहकार्याने काम करणारः उपमहापौर
पणजीच्या विकासासाठी महापौरांच्या हातात हात घालून व त्यांच्या सहकार्याने काम करणार आहे. राज्यात भाजप सरकार असून मनपाही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे सरकारचा मनपाला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सरकारच्या पाठींब्याने आम्ही पणजी शहराचा विकास करणार आहोत, असे उपहापौर वसंत आगशीकर यांनी सागितले.