सातारा / प्रतिनिधी :
खासदार उदयनराजे भोसले चार दिवसांपूर्वी दिल्लीत मराठा आरक्षणासाठी शरद पवारांना भेटले होते. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवारांची भेट घेतली. भेटीबाबत त्यांनी मीडियाला कोणतीही माहिती दिली नाही. तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनीही आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. त्यांनीही मतदार संघातील विकास कामांच्या अनुषंगाने भेट घेतल्याचे सांगण्यात आले.
खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला न्यायचाच या इराद्याने कामाला लागलेले आहेत. त्यांनी मागच्याच चार दिवसांपूर्वी दिल्लीत खासदार शरद पवारांची भेट घेत वडिलकीच्या नात्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती केली होती. राजकारणाच्या पलिकडे जाऊन खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडे साताऱ्यासाठी नवीन काही आणता येईल, याचा प्रयत्न केला.
दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास दोघांच्यात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपला ताफा शरद पवार यांच्याकडे वळवला. शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतल्याची चर्चा रंगत होती. या भेटी त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पक्षीय मतभेद बाजुला ठेवून घेतल्याचे समजते.
खासदार उदयनराजे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वार्ता वाऱ्यासारखी साताऱ्यात पसरली. त्याच बरोबर आमदार शिवेंद्रराजे ही उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटले. अजितदादांची आणि त्यांची दुसरी भेट होती. अजितदादांची पहिली भेट बारामती येथे त्यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत जावून निवासस्थानी भेट घेतली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर मुद्दे असल्याने त्यांच्या भेटीला महत्व आहे.
आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्याकडे सातारा पालिकेच्या निवडणूकीची जबाबदारी असेल असे सूचक वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याच अनुषंगाने तर भेट घेतली नाही ना अशी चर्चा सुरु होती. मात्र, आमदार शिवेंद्रराजेंनी आजची भेट मतदार संघातील विकास कामांच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले.
जिल्हा बँकेची रणनिती काय?
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी एकवटली आहे. त्यांना बाजूला ठेवण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. असे असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्यासोबत घेतलेली भेट ही जिल्हा बँकेच्या अनुषंगाने तर नाही ना अशी चर्चा सुरु होती.









