मुंबई, जोधपूर, अजमेर, गांधीधाम या मार्गावर धावणार रेल्वे
प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने दसरा-दिवाळी उत्सवांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान या उत्सव स्पेशल रेल्वे धावणार आहेत. यामध्ये हुबळी-मुंबई (एलटीटी), बेंगळूर-गांधीधाम, म्हैसूर-अजमेर, बेंगळूर -जोधपूर या रेल्वे धावणार आहेत. यातील काही साप्ताहिक, द्विसाप्ताहिक तर काही दररोज धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग करून लांब पल्ल्याचा प्रवास करता येणार आहे.
रेल्वे क्रमांक 07317 ही रेल्वे हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनल या दरम्यान दररोज धावणार आहे. सायंकाळी 6.35 वा. ही रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकात दाखल होणार आहे. रेल्वे क्रमांक 06506 ही रेल्वे साप्ताहिक असून, बेंगळूर ते गांधीधामदरम्यान धावणार आहे. रविवारी सकाळी 9.35 वा. ही रेल्वे बेळगावमध्ये दाखल होणार आहे.
रेल्वे क्र. 06210 ही रेल्वे द्विसाप्ताहिक असून, म्हैसूर ते अजमेर या मार्गावर धावणार आहे. बुधवारी व शुक्रवारी सकाळी 9.35 वा. रेल्वे बेळगाव स्थानकात येणार आहे. रेल्वे क्र. 06508 ही रेल्वे द्विसाप्ताहिक असून बेंगळूर ते जोधपूरदरम्यान धावणार आहे. मंगळवारी व गुरुवारी सकाळी 9.35 वा. बेळगावमध्ये दाखल होणार आहे.
या उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केल्यामुळे उत्तर भारतात जाणाऱया प्रवाशांना सोय झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून गुजरात, राजस्थान या मार्गांवर रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना इतर रेल्वे स्थानकांतून उतरून या राज्यांना जावे लागत होते. आता या उत्सव स्पेशल रेल्वेमुळे थेट प्रवास करणे सोपे झाले आहे. दसरा, दिवाळी व छटपूजा यासाठी रेल्वे उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.









