आजपासून बरोबर पाचव्या दिवशी गणेशोत्सव आहे. श्रींची मूर्ती विधिवत मखरात बसेल. त्यांची साग्रसंगीत पूजाही होईल. मात्र यावेळी मुंबईतील उत्सवी सजावट पहायला मिळणार नसून कठीण काळातील मुंबई शहराच्या उत्सवी मनातील संवेदनशील स्पिरिट पुन्हा एकदा अनुभवयास मिळणार आहे
रस्त्यावरील मंडपांच्या परवानग्या, श्रींच्या आगमनाची मिरवणूक, डीजे आणि ढोलताशांचे आवाज, रोषणाईचा झगमगाट आणि भक्तांची वर्दळ असे कोणतेही गर्दी खेचणारे दृश्य या वर्षी मुंबईत दिसणार नाही. सार्वजनिक उत्सव मंडळांना कोरोनाच्या महामारीने मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता आहे. त्यातून यावर्षी पुन्हा एकदा माणुसकी जपणाऱया गणेशोत्सवाचे स्वरूप मुंबईत पहायला मिळणार आहे. तशी मुंबईची आणि जगातील अन्य शहरांची तुलना होऊ शकत नाही. जगभरात जेवढय़ा संख्येने सणउत्सव साजरे होत नाहीत तेवढय़ा संख्येने सणउत्सव मुंबईत साजरे केले जातात. या उत्सवांदरम्यान कोटय़वधीची उलाढाल होत असते. लाखो कुटुंबे या दिवसांमध्येच वर्षाची बेगमी करतात. कित्येकांच्या भविष्यातील आर्थिक साखळी यावर अवलंबून असते. तर कित्येकांच्या तोंडी पडणारी चतकोर भाकरीची जागा याच उत्सवी दिवसात श्रीखंड पुरीने घेतलेली असते.
यावर्षी मात्र वर्षातून एकदा मिळणाऱया या श्रीखंड पुरीला लगाम लागला आहे. कित्येकांचे गणित चुकणार आहे. कित्येकांना हा काळ जाता जाईनासा वाटणारा आहे. आयुष्याची गणिते चुकणारी वाटत असली तरीही या गणेशोत्सवात मुंबईचा म्हणजेच मुंबईकरांचा सहभाग हा माणुसकी जपणारा राहणार आहे. यामागील कारण सर्वानाच माहीत आहे. ते म्हणजे कोरोना महामारी होय. या महामारीला घाबरून दोन पावले मागे घेणे असे होत नसून मुंबईने दाखवलेला कमालीचा समजूतदारपणा म्हणता येईल.
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेसुद्धा उत्सवसंहिता आखून दिली आहे. मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आवाहन करावे. सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरून शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे, तसेच मंडप, रोषणाई, डेकोरेशनचा अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी, गणपतीच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. यात मास्क व सॅनिटायझरच्या नियमांचे पालन करणे तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे, मंडपात असलेल्या कार्यकर्त्यांनी हातपाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची व्यवस्था करणे, उत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, तसेच आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच गणपतीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी, अशी उत्सवसंहिता तयार केली आहे.
गेले चार महिने कोंडून घेतलेल्या फ्लॅटच्या खिडकीतून सध्या डोकावून पाहिल्यास रस्त्यावर किंचित वर्दळ दिसून येत आहे. आरोग्यसुरक्षा आणि महामारी प्रसारविरोधातील सर्व नियमांचे पालन करून रस्त्यावर दिसणारे मुंबईकर आवश्यकता वाटत असेल तरच बाहेर पडत आहेत. शिवाय या महामारीचा दुष्परिणाम मुंबई अनुभवत आहे. तसे पहायला गेल्यास यापूर्वी मुंबईवर संकटे आली नाहीत असे नाही. साखळी बॉम्बस्फोटाच्या जखमा ताज्या आहेत. 26/11 चा हल्ला आणि वेठीस धरलेले मुंबईकर ही घटना तर काल-परवा घडून गेली असे मुंबईकरांना वाटते. 26 जुलैची काळरात्र कोणीही विसरू शकत नाही. संसार उद्ध्वस्त झाले मात्र मुंबईकरांनी धसका घेतला नव्हता. सध्या सुरू असलेला कोरोना महामारीच्या साथीत आपल्यामुळे दुसऱयांना त्रास नको म्हणून सण उत्सवांमध्ये स्वतःहून सहभागी न होणारे मुंबईकर दिसून येत आहेत. लढा कोरोनाशी आहे असे गुपित घोषवाक्य म्हणावे इतपत मुंबईतील उत्सवी मने आतून अजिबात खचलेली नाहीत. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी यंदा गोविंदांचे मानवी थर लागण्याऐवजी रक्तदानासाठी रांगा लागल्या होत्या. गणेशोत्सव काळातही त्याच पद्धतीने आरोग्य शिबिरे घेण्यात येतील यात शंका नाही. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईकरांनी मोठय़ा मानाने उत्सवी मनाला नियंत्रणात ठेवलेले दिसून येत आहे. रविवारच्या दिवशी बहुतांश मंडपात गणेशमूर्ती आणण्याच्या प्रथा असून त्यानंतर सजावटीला अधिक वेगळे रूप येत असते. मात्र यावर्षी रविवारचा कोणताही बाऊ करण्यात आला नाही. कित्येक मोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी अनेक फुटींच्या श्रींच्या मूर्तींचा हेका सोडला आहे. तर कित्येक मंडळांनी मूर्तीसह मंडपाच्या उंचीदेखील कमी केल्या आहेत. मंडप सजावट, आगमनाची मिरवणूक, श्रींची आरास, कार्यकर्त्यांचे चहानाष्टा, विद्युत रोषणाई, वार्षिक अहवाल यासारख्या अनेक खर्चाना कात्री लावण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी परिसरातील रहिवाशांसाठी आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटायझरचे वाटप, रक्ताची गरज अशासारख्या कालानुरूप गरजांकडे मंडळाकडून लक्ष पुरवले जाणार आहे. उपनगरमध्ये तर दहा दिवसांचा उत्सव हा गर्दी टाळण्यासाठी दीड ते पाच-सात दिवसांवर आणला आहे. तर काही ठिकाणी घरोघरी वर्गणी मागण्यात येणार नसून शक्य झाल्यास वर्गणी मंडपात आणून द्यावी, असे आवाहन केले आहे. वर्गण्यांचा निधी आरोग्यसुविधांसाठी वापरला जाईल असे ठराव मांडले जात आहेत. या कठीण काळात परस्परांना सांभाळून प्रथा आणि परंपरा जपल्या जाणार आहेत.
आजपासून बरोबर पाचव्या दिवशी गणेशोत्सव आहे. श्रींची मूर्ती विधिवत मखरात बसेल. त्यांची साग्रसंगीत पूजाही होईल. मात्र यावेळी मुंबईतील उत्सवी सजावट पहायला मिळणार नसून कठीण काळातील मुंबई शहराचे हे उत्सवी मनातील संवेदनशील स्पिरिट पुन्हा एकदा अनुभवायास मिळणार आहे.
राम खांदारे








