लॉकडाऊनचा मोठा फटका : अवैध दारू वाहतुकीचे 77 गुन्हे
प्रतिनिधी / ओरोस:
‘कोरोना’मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका राज्य उत्पादन शुल्क विभागालाही बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा एक्साईज विभाग महसूलच्या उद्दिष्टात तब्बल तीन कोटी रुपयांनी मागे पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ाला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 19 कोटी 98 लाखांचे महसूली उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मार्चअखेर 16 कोटी 92 लाख रुपये महसूल गोळा झाला आहे. अवैध दारू वाहतूक, बार परवाना, नियमांचे उल्लंघन तसेच परवाना नूतनीकरण इत्यादीच्या माध्यमातून हा महसूल गोळा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांनी दिली.
महिनावार जमा करण्यात आलेला महसूल
एप्रिल 2019 मध्ये 1 कोटी 36 लाख 90 हजार 69 रुपये, मे मध्ये 1 कोटी 49 लाख 98 हजार 510, जूनमध्ये 1 कोटी 36 लाख 46 हजार 418, जुलै मध्ये 1 कोटी 24 लाख 56 हजार 42 रुपये, ऑगस्टमध्ये 1 कोटी 44 लाख 9 हजार 940, सप्टेंबरमध्ये 1 कोटी 33 लाख, 56 हजार 178 रुपये, ऑक्टोबरमध्ये 1 कोटी 5 लाख 25 हजार 675, नोव्हेंबरमध्ये 1 कोटी 48 लाख 34 हजार 411, डिसेंबरमध्ये 1 कोटी 18 लाख 25 हजार 631 रुपये, जानेवारी 2020 मध्ये 1 कोटी 70 लाख 28 हजार 214, फेब्रुवारीमध्ये 1 कोटी 54 लाख 38 हजार 214, मार्चमध्ये 1 कोटी 69 लाख 54 हजार 88 एवढा महसूल गोळा करण्यात आला.
‘लॉकडाऊन’मध्ये 52 आरोपी अटक
अपुरा कर्मचारी वर्ग असतानादेखील
22 मार्च ते 23 एप्रिल या लॉकडाऊन च्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध
दारू वाहतुकीवर मोठय़ा
प्रमाणात कारवाई करण्यात आली. या
कालावधीत एकूण 77 गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यामध्ये 52 आरोपींना अटक करण्यात
आली आहे. तसेच एकूण 11 वाहने जप्त केली असून एकूण 11 लाख 62 हजार 352 रुपये किंमतीचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गोवा बनावटीची दारू, गोवा फेणी, बिअर, गावठी दारू
अशी एक हजार लिटरपेक्षा जास्त दारू तर 2 हजार 625 लिटर रसायन जप्त करण्यात आले, अशी
माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांनी दिली.
‘कोरोना’मुळे महसुलात घट
‘कोरोना’च्या आजारावरील उपाययोजना म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा या व्यवसायाला जबर फटका बसला आहे. दरवर्षी उद्दिष्टाची पूर्तता करणारा हा विभाग यावर्षी तब्बल उद्दिष्टाच्या तीन कोटी रुपयांनी मागे पडला आहे. शासन स्तरावर राज्यभरात दारूबंदीचा निर्णय झाल्याने देशी-विदेशी दारू दुकानांसह परमिट रुममध्ये होणारी गर्दी थांबली. त्याचा परिणाम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलावर झाला. कारखान्यातील मद्य निर्मितीचा महसूल दरमहा जमा होत असला तरी देशी-विदेशी दारू परवानाधारकाचे नूतनीकरण मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात होत असल्याने हा फटका बसल्याचे सांगण्यात आले.









