आविष्कारतर्फे स्टॉलधारकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
आविष्कार महिला उद्यमशील संस्थेतर्फे लवकरच आविष्कार उत्सव भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टॉलधारकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम सोमवारी दुपारी भाग्यनगर येथील लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. कीर्ती शिवकुमार व सुनीता पाटणकर यांनी स्टॉलधारकांना मार्गदर्शन केले.
कीर्ती शिवकुमार म्हणाल्या, कोणत्याही प्रदर्शनात उद्योजक भाग घेतात. त्याचे कारण म्हणजे आपल्या उत्पादनाची जाहिरात करणे, संपर्क वाढविणे, बॅण्ड निर्माण करणे होय. फक्त नफा हा विचार करू नये. प्रदर्शनात भाग घेण्यासाठी तीन ते चार महिन्यांपासून तयारी करावी. आपले उत्पादन वैशिष्टय़पूर्ण असेल यावर भर द्यावा. प्रत्येक व्यक्ती खरेदीलाच येते असे नाही तर ती विंडो शॉपिंगसुद्धा करत असते. तीन सेकंदात ग्राहकाचे आपल्या स्टॉलकडे लक्ष वेधून घेता यायला हवे. प्रदर्शनात ग्राहक प्रत्यक्ष भेटू शकतो. त्यामुळे उत्पादनाचे सादरीकरण आकर्षक करा, परस्परांना मदत करा, ज्याने तुमचा परिचय आणि संपर्क वाढू शकतो. मुख्य म्हणजे आपल्या उत्पादनांबद्दल अभिमान बाळगा, असेही त्या म्हणाल्या.
सुनीता पाटणकर यांनी खाद्यपदार्थ तयार करताना दर्जा महत्त्वाचा आहे. प्रारंभीच्या काळात फार नफ्याचा विचार करू नका. शक्मयतो आपल्या समवेत इतर महिलांना काम करण्याची संधी द्या. संवाद कौशल्य वाढविणे आवश्यक आहे. शिवाय उत्पादनावर दर, वजन, तारीख, संपर्क क्रमांक याची नोंद हवी. सेलींग आणि वेईंग मशीन घेणे आवश्यक आहे. याशिवाय अन्न सुरक्षा कायद्याची माहिती घेऊन त्याचा परवाना घेणे आवश्यक आहे. दुसऱयाला आपला पदार्थ कसा वाटतो, हे जाणून घेत राहिले पाहिजे. खाद्यपदार्थ तयार करताना त्याचे पौष्टिक मूल्य लक्षात घेऊन तशी नोंद करणे आवश्यक आहे. तसेच फूड बिझनेस ऑपरेटरची माहिती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. निहारिका पुसाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी त्यांना भेटवस्तू दिली.