उदय मडकईकर यांचा दावा : उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा.बाबूशचा पाडाव हेच सर्वांचे लक्ष्य
प्रतिनिधी /पणजी
पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी अपक्ष उमेदवार उत्पल मनोहर पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला असून भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांचा पाडाव करणे हाच उद्देश त्यामागे असल्याचेही स्पष्ट केले आहे.
भाटले-पणजी येथील आपल्या निवास्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मडकईकर यांनी वरील घोषणा करून सांगितले की, आपले कार्यकर्ते, समर्थक यांनी उत्पलला पाठिंबा देण्याची सूचना केली. अनेक लोकांनी फोन करून उत्पलसाठी काम करावे आणि त्यांना निवडून आणावे. बाबूश मोन्सेरातना त्यांची जागा दाखवावी अशी गळ घातली. शिवाय तृणमूल काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू नये असे आपणास बजावले. त्यामुळे मतांची विभागणी होऊन मोन्सेरातना लाभ होईल, असे मत सर्वांनी प्रकट प्रकट केले, अशा प्रकारे सर्वांची मते ऐकून व सर्वांना विश्वासात घेऊन उत्पल यांना पाठिंबा देण्याचे ठरवले, अशी माहिती मडकईकर यांनी दिली. उत्पलसोबत आपण पूर्णवेळ प्रचारासाठी फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेकांचे प्रस्ताव आपण फेटाळले
आपचे वाल्मिकी नाईक, तृणमूल काँग्रेसचे लुईझिन फालेरो यांनी घरी येऊन पक्षात प्रवेश करा, पणजीची उमेदवारी देतो, निवडून आणतो, अशी आश्वासने दिली होती. काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स हे देखील येऊन भेटले व त्यांनी पाठिंबा मागितला. तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवला तसेच आप, तृणमूल काँग्रेसचा प्रस्तावही फेटाळून लावल्याचे मडकईकर यांनी नमूद केले.
उत्पल स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार असून मोन्सेरात यांना हटवणे हेच एकमेव ध्येय असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा वाढत जाणार असून ते विजयी होतील आणि मोन्सेरात घरी बसतील, अशी खात्री मडकईकर यांनी वर्तविली.









