प्रतिनिधी /पणजी
माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उत्तरले असून गेल्या काही दिवसांत त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन आपल्याला विजयी करण्याची विनंती केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी पणजी मतदारसंघातील सर्व भागांतील मतदारांशी संपर्क ठेवला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये त्यांनी लोकांना आधार दिला आहे. काल मंगळवारी त्यांनी कांपाल परिसरात आपला प्रचार केला. मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी चित्र पहायला मिळाले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मतदारसंघातील सर्व मतदार सुजाण असून त्यांना कोण कसा आहे, याची पूर्ण कल्पना आहे. म्हणून मतदार आपल्या बाजूने उभे आहेत. आज अनेक कार्यकर्ते, मतदार स्वतःहून आपल्यासाठी कार्य करत आहेत. या सर्वांच्या आशीवार्दाने आपण विजयी होईल, असा विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर त्यांच्या सोबत होते. त्यांनी उत्पल पर्रीकरांचा विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.









