पत्रकार परिषदेतून घोषणा : भाजप सदस्यत्वाचा राजीनामा
प्रतिनिधी /पणजी
भाजपला समजावण्याचे सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असून पर्रीकरांचा राजकीय वारसा पुढे नेणे हेच आपले ध्येय असल्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांनी जाहीर केले.
शुक्रवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढी वर्षे भाजपसाठी काम करताना माझे वडील मनोहर पर्रीकर यांनी पणजीतील लोकांशी एक अतूट नाते निर्माण केले होते. पणजीतील लोकांनी केवळ ’मनोहर पर्रीकर’ म्हणून त्यांना मतदान केले नव्हते तर त्यांच्या नीतिमुल्यांमुळे लोक मतदान करत होते. तेच नाते आपणही निर्माण केले असून त्यांचा तोच वारसा पुढे नेण्याचे काम करणार आहे, असे उत्पल यांनी सांगितले.
गेल्या 30 वर्षात माझ्या वडिलांसोबत भाजपसाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांनीच हा पक्ष बांधला आहे. तेच कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत, हे भाजपला समजावण्याचे हरतरेचे प्रयत्न मी केले. तरीही अनाकलनीय कारणासाठी मला पणजीची उमेदवारी नाकारण्यात आली आणि केवळ दोनच वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या एका संधीसाधू व्यक्तीस ती देण्यात आली. त्यामुळे आता अन्य पर्याय राहिला नसल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, असे उत्पल म्हणाले.
पणजीकरच काय ते निर्णय घेतील
आता माझे भवितव्य पणजीकरांच्या हाती आहे आणि तेच काय तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. कोणताही हुद्दा किंवा पद मिळविण्यासाठी ही निवडणूक लढत नाही तर माझा विश्वास असलेल्या नीतितत्वांसाठी व पणजीसाठी लढत आहे. मला माझ्या पक्षासोबत वाटाघाटी करायच्या नाहीत आणि कदापी करणारही नाही, असेही ते म्हणाले.
भाजपशिवाय, पणजीशिवाय विचार नाही करु शकत
दरम्यानच्या काळात अनेक पक्षांकडून प्रस्ताव आले. त्याचबरोबर भाजपकडूनही अन्य मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु मला त्यात स्वारस्य नाही. पणजीशिवाय अन्य कोणत्याही मतदारसंघांचा आणि भाजपशिवाय अन्य कोणत्या पक्षाचा विचार करू शकत नाही, असे उत्पल यांनी स्पष्ट केले.
सुदैवाने पणजीतून विजयी झाल्यास पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का? असे विचारता, तो निर्णय सर्वस्वी गोमंतकीय जनतेच्या दरबारात घेतला जाईल, असे ते म्हणाले.
यापूर्वी पणजीत झालेल्या पोटनिवडणुकीवेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी विद्यमान भाजप उमेदवाराच्या चारित्र्याचा पाढा वाचला होता. अशा उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी कोणताही पक्ष मला पाठिंबा देत असेल तर त्यांचे स्वागत करणार असे उत्पल यांनी सांगितले.









