वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
भारताजवळ असलेली अत्याधुनिक लढाऊ मिग 29 ही विमाने उत्तर सीमेनजीक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी ही विमाने लडाखच्या नियंत्रण रेषेच्या संरक्षणासाठी झेप घेऊ शकतात, असे वायुदलाने स्पष्ट केले. चीनबरोबरचा तणाव पाहता भारताने सर्व सज्जता ठेवली आहे.
देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी तिन्ही सेनादलांनी सज्ज राहणे आवश्यक असून या तिन्ही सेनादलांमध्ये उक्तृष्ट समन्वय राखला जावा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी केली होती. या सूचनेला अनुसरून तयारी करण्यात येत आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच लढाऊ विमानांच्या दोन तुकडय़ांनी भूसेनेबरोबर संयुक्त सराव लडाख सीमेनजीक केला आहे. आता मिग 29 ची नियुक्ती होत आहे.
नौदलही सज्ज
भारतीय नौदलाकडे सध्या 40 मिग 29 विमाने असून ती अण्वस्त्रे वाहून नेण्यासही सक्षम आहेत. ही विमाने भारताच्या विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवरही आहेत. सर्वसाधारणपणे त्यांची उपस्थिती गोव्याजवळच्या नौदल तळावर असते. याशिवाय अन्य मिग 29 विमाने उत्तर सीमेवर नियुक्त करण्यात आली आहेत. रशियाकडून ही विमाने आणि ही विमानवाहू नौका 10 वर्षांपूर्वी विकत घेण्यात आली आहे. ही विमाने भारताच्या सीमांचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे नौदलाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.
काही विमाने गस्तीसाठी
नौदलाची काही मिग 20 विमाने सध्या लडाख सीमेनजीक गस्तीसाठी पाठविण्यात आली आहेत. ही विमाने चीनी सैन्याच्या हालचाली आणि त्यांची स्थाने यांच्यावर बारकाईने देखरेख करीत आहेत. किंचितशी हालचाल दिसून आली तरी ही माहिती त्वरित भूसेनेच्या सीमेवरील तुकडय़ांच्या प्रमुखांना दिली जाते, अशीही माहिती नौदलाकडून पत्रकारांना देण्यात आली.
सागरतटही सज्ज
चीनने सध्या हिंदी महासागरात आपल्या नौदलाची उपस्थिती वाढविली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अंदमान आणि निकोबारच्या परिसरात आपल्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा तैनात केल्या आहेत. येथे भारताच्या नौदलाचा सातत्याने युद्धसराव सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेची विमानवाहू नौका निमित्झही या परिसरात येणार असून दोन्ही देशांचा संयुक्त युद्धसराव होणार आहे. चीनवर दबाव आणण्यासाठी ही संयुक्त रणनीती आहे. भारताने आपल्या आण्विक शक्तीवर चालणाऱया चक्र आणि अरिहंत या पाणबुडय़ाही कार्यरत ठेवल्या आहेत, असे सांगण्यात आले.









