वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या उत्तर तसेच पूर्व भागात कडाक्याची थंडी पडली असून राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, दिल्ली आणि चंदीगड, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी कमाल तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. झारखंडमध्ये अतिथंडीमुळे 15 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर पंजाबात धुक्यामुळे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतातील रेल्वे आणि विमानसेवेवरही मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे.
हवामान विभागानुसार दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम उत्तरप्रदेशात थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तर पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहारमधील तापमान अधिक खालावण्याची शक्यता आहे. सर्व ठिकाणी धुक्याची स्थिती मात्र कायम राहणार आहे.
sदिल्ली : थंडीसह दाट धुके
मंगळवारी सकाळी दिल्लीचे किमान तापमान 3 अंशच्या खाली नोंदविले आहे. तर दाट धुक्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील दृश्यमानता कमी होत 25 मीटरवर आली आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये धुक्याची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे.
sराजस्थान : 1 अंश सेल्सिअस
मंगळवारी सकाळी राजस्थानच्या सर्व शहरांमध्ये 1 ते 2 अंशांदरम्यान तापमान नोंदले गेले. सर्वात कमी तापमान सीकरमध्ये 1 अंश सेल्सिअस राहिले. जयपूरमधील विमानसेवा तसेच रेल्वेसेवेवर याचा प्रभाव पडला आहे. राज्यातील थंडीची लाट आणखीन काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.
sहिमाचल प्रदेश : जोरदार हिमवृष्टी
पर्वतीय क्षेत्रात हिमवृष्टीमुळे राज्यातील थंडी अधिकच वाढली आहे. लाहौल-स्पीतिमध्ये किमान तापमान उणे 24 अंशावर आले आहे. तर राजधानी शिमला येथील तापमान 2 अंश सेल्सिअस राहिले. रोहतांग खिंड तसेच केलांगमध्येही तापमान शून्याच्या खाली राहिले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
sउत्तरप्रदेश : कडाक्याची थंडी
राज्यातील सहारनपूर आणि सुल्तानपूरमध्ये किमान तापमान 4 अंशांपेक्षाही कमी राहिले आहे. कानपूर, उन्नाव, लखनौ, आगरा आणि बांदा येथली तापमान कमी झाले आहे.
sबिहार : 13 रेल्वे रद्द
धुक्याने रेल्वेंचा वेग कमी झाल्याने अनेक रेल्वेगाडय़ा कित्येक तासांच्या विलंबाने धावत आहेत. या कारणामुळे 13 रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या आहेत. तर पाटणा येथील प्रतिकूल हवामानामुळे हवाईसेवेवरही प्रतिकूल प्रभाव पडला आहे. अनेक विमानफेऱयांना मोठा विलंब झाला आहे.
sउत्तराखंड : 12 फूटापर्यंत बर्फ
हिमालयातील टेकडय़ा बर्फाने झाकल्या गेल्या आहेत. चमौली जिल्हय़ातील श्री हेमकुंड साहिबच्या गुरुद्वारानजीक बर्फाचा मोठा थर जमा झाला
आहे. गुरुद्वारानजीक 12 फुटांपेक्षा अधिक उंचीचा बर्फ जमा झाल्याचे सांगण्यात आले
आहे.
हिमवृष्टी अन् पाऊस
हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये पर्वतीय क्षेत्रात हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. तर 1 आणि 2 जानेवारी रोजी मैदानी भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. पाऊस पडल्यावर पुन्हा एकदा तापमानात घट होऊ शकते.








