ऑनलाइन टीम / हाथरस :
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारातील 22 वर्षीय दलित तरूणीचा आज सकाळी दिल्लीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- सरकारकडून पीडितेच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश सरकारने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
माहितीनुसार, चंदपा येथे राहणाऱ्या दलित तरुणीवर 14 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. आपल्या आईसोबत तरुणी शेतावर चारा गोळा करण्यासाठी गेली असता चार जणांनी या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीला आरोपींनी गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यावेळी मुलीने आरडाओरडा सुरू केला. मात्र मुलीने आरडाओरडा सुरू करताच, आरोपींनी पीडितेची जीप कापून टाकली.
गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या या तरुणीवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत माहिती देताना हाथरसचे एएसपी प्रशांत कुमार म्हणाले की, चारही आरोपींना आधीच पकडण्यात आले आहे. 376 डी सेक्शन अंतर्गत सरकारने निर्धारित केलेल्या रक्कमेचा पहिला टप्पा म्हणजेच 4,12,500 रुपये पीडित कुटुंबियांच्या खात्यात जमा केले आहेत. तसेच पीडितेचे पोस्टमार्टम दिल्लीत केले जात आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करत आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.









