मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या बदलत्या वातावरणामुळे पाचावर धारण झाली आहे. कारण हाथरस घटनेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याचे पडसाद साऱया देशभर कमी अधिक प्रमाणात पडणार आहेत.
उत्तरेत थंडीला सुरुवात झाली आहे. पण उत्तर प्रदेशचे राजकारण मात्र तापू लागले आहे. देशाच्या या सर्वात मोठय़ा प्रांतात सारे काही उफराटे वाटत असल्यामुळे त्याला काहीजण उपहासाने ‘उलटा प्रदेश’ देखील संबोधतात. राजकीयदृष्टय़ा सर्वात महत्त्वाचे राज्य असल्याने 80 सदस्य लोकसभेत पाठवणाऱया उत्तर प्रदेशात 2014 पासून भाजपने दिमाखदार कामगिरी केल्यानेच नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकले. जे स्वतःला पंतप्रधान मोदींचे नैसर्गिक राजकीय उत्तराधिकारी मानतात त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या बदलत्या वातावरणामुळे पाचावर धारण झाली आहे. कारण हाथरस घटनेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याचे पडसाद साऱया देशभर कमी अधिक प्रमाणात पडणार आहेत.
हाथरस येथील एका दलित मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने केवळ योगी सरकारच हादरलेले नाही तर सारी भाजपा हादरलेली आहे. जे आपणच देशातील सर्वात बेस्ट मुख्यमंत्री आहोत असा भासवणाऱया योगींना आता चहुबाजूंनी प्रश्नांनी घेरले आहे असे दिसत आहे. हाथरस प्रकरणाची एकंदर हाताळणीच एवढी खराब झाली आहे की त्यामुळे हे सरकार आपल्याच जाळय़ात अडकत चालले आहे की काय अशी शंका यावी. आता या घटनेला दलित विरुद्व सवर्ण असे वळण देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचबरोबर ज्या दलित मुलीवर कथित बलात्कार झाला ती बदफैली होती असे सुचविण्याचे उद्योगदेखील सुरू आहेत. या संपूर्ण प्रकाराबाबत योगी अथवा पंतप्रधान अवाक्षरही बोललेले नाहीत. हाथरसला वृत्तांकनासाठी गेलेल्या केरळच्या एका पत्रकारालादेखील एका कडक कायद्याखाली अटक केल्याने हा वाद आणखीनच चिघळला आहे. या दलित मुलीच्या मृत्यूमागे जर काही गूढ नव्हते तर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची घाई का करण्यात आली? तिच्या कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता जिल्हा प्रशासनाने काळोख्या मध्यरात्रीत तिला का जाळले? त्या मुलीने आपल्या मृत्यूपूर्व जबाबात चार युवकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारले असे म्हटले आहे. त्यामुळे योगी सरकारच्या एकूण हेतूंविषयीच संशय निर्माण झाला नसता तरच नवल होते. चार महिन्यापूर्वी उज्जैनमधील महाकालेश्वराच्या दर्शनानंतर पोलिसांना शरण गेलेला गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर केला गेल्याने योगींना महाकालाचा प्रकोप झेलावा लागत आहे असे काही भाविक मानतात. उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजातील एक वजनदार वर्गदेखील या एन्काऊंटरने दु:खी झाला. ठाकूर असलेले योगी ब्राह्मणांच्या जीवावर उठले आहेत असा या वर्गाचा समज आहे. महाकालाचा प्रकोप झाला आहे की नाही हे काळ ठरवेल पण योगी सरकारचा निर्ढावलेपणा मात्र विविध घटनांनी समोर आलेला आहे. योगींच्या राज्यात पोलीस मोकाट सुटले आहेत आणि ते एन्काऊंटरच्या नावाखाली दिवसाढवळय़ा हत्या घडवत आहेत असे आरोप होत आहेत. मारले गेलेले बरेच जण हे मुस्लिम आहेत. योगी हे दबंग समजल्या जाणाऱया ठाकूर समाजातील असल्याने त्या जातीतील लोकांना सरकार दरबारी झुकते माप दिले जात आहे. भाजपमधील ठाकूर नेत्यांना कट टु साईझ करून योगींना राज्यातील ठाकुरांचा नेता व्हायचे आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंग हे ठाकूर असल्यामुळेच राज्यात त्यांचे पंख छाटण्याचे राजकारण सुरू आहे. राजनाथना तोंड दाबून बुक्मयांचा मार सहन करावा लागत आहे. 2017 ची विधानसभा निवडणूक ही ‘नरेंद मोदी विरुद्ध इतर’ अशा प्रकारे लढवून भाजपने आपल्या विरोधकांना चारी मुंडय़ा चित केले होते. आता होणाऱया निवडणुकीचे स्वरूप ‘राम विरुद्ध इतर’ असे दाखवण्याची भाजपची रणनीती स्पष्ट दिसत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करून मोदींनी 2022 मधील उत्तर प्रदेश मधील पुनर्विजयाचा पायाभरणी समारंभच केलेला आहे असे सत्ताधारी मानतात. अयोध्या तो एक झांकी है, काशी, मथुरा बाकी है’, ही संघ परिवाराची जुनी घोषणा आहे. त्याचाच एक भाग म्हणून मथुरेच्या कृष्ण जन्मस्थानालगतची मशीद काढून टाकावी याबाबत काही मंडळी आता न्यायालयाची पायरी चढले आहेत. अशावेळेला योगींच्याविरुद्ध सुरू असलेले वादळ मोदींकरता एक डोकेदुखी आहे. योगींना बदलले नाही तर राज्यातील असंतुष्ट झालेले ब्राह्मण, दलित आणि मुस्लिम समाज एक होऊन निवडणुकीत भाजपकरता अडचणीची परिस्थिती निर्माण होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण योगींना बदलणे ही सोपी गोष्ट नाही. कारण मठाधिपती असलेले योगी हे आदेश देण्यावर विश्वास करतात, आदेश स्वीकारण्यावर नाही. योगींनी राज्यात तसेच इतरत्र आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. योगींनी भाजपकरता नाजूक स्थिती निर्माण केली असताना प्रियांका गांधी वद्रा यांना काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रभारी सरचिटणीस बनवून राहुल गांधी राज्यातील येत्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला जोरदार टक्कर देण्याचे काम करणार याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हाथरस असो अथवा विस्थापित कामगारांचा प्रश्न प्रियांका आणि राहुल जमिनीवरचे राजकारण करताना दिसत आहेत. मात्र पुढील दीड वर्षात प्रियांका उत्तर प्रदेशात कशा कामाला लागतात त्यावर चार नंबरवर फेकला गेलेला काँग्रेस किती वर येणार हे दिसणार आहे. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष फारसा सक्रिय नसला तरी त्यानेदेखील निवडणुकीची तयारी सुरू केलेली दिसत आहे. मायावतींचा बहुजन समाज पक्ष मात्र कुंभकर्णाप्रमाणे निद्रिस्तावस्थेत दिसत आहे. मायावतींच्या दलित मतपेढीवर डोळा असलेले चंद्रशखर आझादसारखे नेते अचानक सक्रिय झाले आहेत. भाजपचे वेगळेच गणित आहे. भगवान रामाचे भव्य गगनचुंबी मंदिर बांधण्याची प्रक्रिया सुरू करून ‘तुम्ही रामाची औलाद की बाबरची?’ असा खडा सवाल विचारून 2022 ची लढाई सर करण्याचा त्याचा डाव आहे.
उत्तर प्रदेश हे साधेसुधे राज्य नाही. पं. नेहरूंपासून बरेच पंतप्रधान या राज्याने देशाला दिलेले आहेत. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रतापसिंग, चंद्रशेखर हे सारे उत्तर प्रदेशातील. तांत्रिकदृष्टय़ा नरेंद्र मोदीदेखील उत्तर प्रदेशमधील. कारण राष्ट्रीय नेता बनण्यासाठी त्यांना वाराणसीहून खासदार बनावे लागले हा ताजा इतिहास आहे. 2014 साली मोदींनी वाराणसीमधून भाजपचे पंत प्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याने साऱया उत्तरेत हिंदुत्वाची लाट पसरली आणि काँग्रेसची देशातील सत्ताच तर गेलीच पण त्याला 543 सदस्यीय लोकसभेत अवघ्या 44 जागा मिळाल्या. गेल्या सत्तर वर्षात उत्तर प्रदेशने मोठ-मोठे राजकीय चमत्कार करून दाखवलेले आहेत.
सुनील गाताडे









