उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ आणण्याचे स्वप्न दाखवून 2017 मध्ये भाजप सत्तेवर आला. आता देशातील रामाचा सर्वात मोठा पुतळा अयोध्येत बनवण्याची आदित्यनाथ यांनी घोषणा केलेली आहे. जंगल राजच्या टीकेने विचलित होणारे आदित्यनाथ नव्हेत.
उत्तर प्रदेशात जे काही घडते ते सारे अजब आणि चमत्कारीकच. आठ पोलिसाना गोळीबारात उडवणाऱया गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरनी उत्तर प्रदेशात जंगल राज्य आहे ही गोष्ट जगाला कळून चुकली आहे. उत्तर प्रदेशात झालेला हा पहिलाच एन्काऊंटर नाही. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून कित्येक गुंडाना असेच यमसदनी पाठवण्यात आलेले आहे. पण त्यातील बहुतांश हे मुस्लिम, दलित अथवा मागासवर्गीय जमातींचे होते आणि मायावती अथवा मुलायमसिंग यादव यांच्या कार्यकालात त्यांना ‘राजाश्रय’ होता. दुबे हा ब्राह्मण होता आणि वेळोवेळी सर्वच पक्षांचा त्याच्यावर वरदहस्त होता. 2001 साली राजनाथसिंग मुख्यमंत्री असताना एका स्थानिक जे÷ भाजप नेत्याचा त्याने भरदिवसा पोलीस स्टेशनमध्ये खून केला होता आणि त्यातून तो पुराव्याअभावी सुटला होता. यातून ज्याने त्याने काय समजायचे ते समजावे.
उडदामाजी काळे गोरे असाच हा सारा प्रकार आहे. काँग्रेस राज्यात सत्तेत होती तेव्हा धुतल्या तांदळासारखी होती असे म्हणणे धारिष्टय़ाचे आहे. मुलायमसिंग यादव यांना तर मायावती ‘डाकूंचा नेता’ असे म्हणत. 25 वर्षापूर्वी मोतीलाल व्होरा हे राज्याचे राज्यपाल असताना भाजपने बसपला साथ दिल्याने राष्ट्रपती राजवट उठवून मायावती यांना मध्यरात्री शपथ देण्यात आली. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊनदेखील मायावती राजभवनाच्या बाहेर पडल्या नाहीत. मुलायमचे गुंड आपला एन्काऊंटर करतील या भीतीने मायावतींनी रात्र राजभवनातच काढली. रातोरात त्यांनी आपल्या विश्वासू पोलीस आणि सनदी अधिकाऱयांना महत्त्वाची पदे दिली आणि त्यांनी सुरक्षा कवच निर्माण केले. त्यानंतरच त्या राजभवनातून बाहेर पडल्या. जर एका मुख्यमंत्र्यांची ही अवस्था तर अशा उत्तर प्रदेशात दुबेचे एन्काऊंटर झाले नसते तरच नवल होते. दुबेच्या एन्काउंटरमुळे कितीही वाद मजला तरी त्याच्याबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ब्राह्मण समाज महाराष्ट्रासारखा पापभिरू आणि राजकारणापासून दूर नाही. त्यातील काही जण अति गरीब आहेत तर काही दबंग. दोन्ही राज्यात बरेच ब्राह्मण मुख्यमंत्री झाले असल्याने सत्तेच्या राजकारणातदेखील तो पुढे राहिला आहे. दुबे हा कुख्यात असला तरी तो ब्राह्मण समाजाचा असल्याने आणि तो एका ठाकूर मुख्यमंत्र्यांकडून मारला गेल्याने उत्तरेतील ब्राह्मण भडकले आहेत. याचा परिणाम बिहारमधील निवडणुकीत होऊ नये यासाठी आता भाजप प्रयत्नशील राहील. उत्तरेत ब्राह्मण आणि ठाकूर समाजाचे राजकीय हाडवैर आहे. बिहारमधील भूमिहार समाजदेखील ठाकूर समाजाला पाण्यात पाहतो. ब्राह्मण आणि भूमिहार हे सध्या भाजप-संयुक्त जनता दल गठबंधनाबरोबर आहेत.
दुबेच्या एन्काऊंटरमुळे उत्तर प्रदेशात सुशासन नावाची चीज अस्तित्वात नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. योगी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या गोरखपूर या शहरात सरकारी इस्पितळात ऑक्सिजनअभावी बऱयाच बालकांचा मृत्यू झाला होता तेव्हा गहजब माजला होता. भाजप सत्तेत आल्यावर गेल्या तीन वर्षात उत्तर प्रदेशमध्ये फारशी प्रगती झालेली नाही. प्रसारमाध्यमांमध्ये मात्र योगी हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत अशी भरपूर जाहिरातबाजी होत आहे. महत्त्वाकांक्षी योगींची नजर दिल्लीवर आहे आणि आपल्या भगव्या कपडय़ांमुळे देशभर आपली स्वीकारार्हता पुढील काळात अजून वाढेल अशी त्यांची अपेक्षा आहे. आपल्याला संसाराचे पाश नाहीत हे ते मोदींप्रमाणे लोकांच्या मनात वेळोवेळी ठसवत असतात. आदित्यनाथ यांना आपली छबी कठोर प्रशासक म्हणून बनवायची आहे त्यासाठी ते साम, दाम, दंड, भेद असे सारे प्रकार उपयोगात आणतात. यात राज्यकारभाराचे बारा वाजले तरी त्यांना त्याचे फारसे देणेघेणे नाही.
पाच वेळा खासदार राहिलेल्या आदित्यनाथ यांना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना खडय़ाप्रमाणे दूर ठेवण्यात आले होते. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनीदेखील योगींना साधे राज्यमंत्रीदेखील बनवले नव्हते. उत्तर प्रदेश भाजपच्या अंतर्गत देखील योगींची प्रतिमा ही एका दबंग नेत्याची आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशला काहीजण ‘उलटा प्रदेश’ म्हणतात. कारण देशातल्या या सगळय़ात मोठय़ा राज्यात फारशी काही सुधारणाच होत नाही अशी त्यांची धारणा. स्वातंत्रोत्तर काळात किती सरकारे आली आणि गेली तरी उत्तर प्रदेशात ‘पहिले पाढे पंचावन्न’ असाच काहीसा हाल. 2017 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्याने जोर पकडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी न भूतो, न भविष्यती असे यश पक्षाकरता मिळवले.
हिंदू-मुस्लिम विभाजनाचा डाव खेळून भाजपने उत्तर प्रदेशावरील पकड गेल्या सहा वर्षात पक्की केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव करून काँग्रेसला निकालात काढण्यात आले. त्यात आता अयोध्या येथे भव्य राम मंदिर बांधण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सुकर झाला असल्याने भाजपला अजूनच बाळसे चढले आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधूनच निवडणूक लढवत असल्याने सत्ताधारी पक्षाचा वरचष्मा या राज्यात आहे. देशाच्या या सर्वात मोठय़ा राज्यात ‘राम राज्य’ आणण्याचे स्वप्न दाखवून 2017 मध्ये भाजप सत्तेवर आले आता देशातील रामाचा सर्वात मोठा पुतळा अयोध्येत बनवण्याची आदित्यनाथ यांनी घोषणा केलेली आहे. जंगल राजच्या टीकेने विचलित होणारे आदित्य नाथ नव्हेत. 2002 साली गुजरात दंगलीनंतर वाजपेयींचा ‘राजधर्म’ निभावण्याचा सल्ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी किती मानला होता हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. सध्यातरी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये दूरदूर काही आव्हान दिसत नाही. पण हाच काळ फसवा असतो.
सुनील गाताडे








