दोन्ही राज्यात 65 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद
देहराडून, लखनौ / वृत्तसंस्था
उत्तराखंड विधानसभेसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. राज्यातील 70 जागांसाठी सर्व 13 जिल्हय़ांमध्ये एकाच टप्प्यात झालेल्या या प्रक्रियेदरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.37 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तसेच उत्तरप्रदेशमधील दुसऱया टप्प्यात 55 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत म्हणजेच सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे दिसून आले. यासंबंधीची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाकडून मंगळवारी जाहीर केली जाणार आहे.
उत्तराखंडमध्ये सोमवारी सर्व 70 मतदारसंघांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाल्यापासून बहुतांश केंद्रांवर मतदार हजार असल्याचे दृश्य दिसून येत होते. सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी आयोगाने जारी केलेले निर्देश पाळत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांसह अधिकाऱयांची धडपड सुरू होती. मतदानादरम्यान काही ठिकाणी मतदानयंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही दिसून आल्या. मात्र, पर्यायी मतदानयंत्रे उपलब्ध करून तातडीने मतदान सुरू करण्यात आले.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंद झालेल्या टक्केवारीनुसार हरिद्वारमध्ये सर्वाधिक 67.58 टक्के मतदान झाले होते. तर उत्तरकाशी 65.55, उधमसिंगनगर 65.13, नैनिताल 63.12, रुद्रप्रयाग 60.36, चमोली 59, बागेश्वर 57.83, चंपावत 56.97, देहराडून 52.93, तेहरी 52.66, पौरी गऱहवाल 51.93, अलमोडा 50.66 आणि पिथोरगडमध्ये 57.19 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
उत्तरप्रदेशातही मतदारांचा प्रतिसाद
उत्तरप्रदेशमधील दुसऱया टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सहारनपूरमध्ये सर्वाधिक 67.05 टक्के मतदान झाले होते. तर, अमरोहमध्ये 66.15 आणि मोरादाबादमध्ये 64.52 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शाहजहानपूरमध्ये सर्वात निचांकी म्हणजेच 55.20 टक्के मतदान झाल्याची माहितीही निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसून येत होते. दुपारच्या सत्रात काही प्रमाणात कमी मतदार दिसत असले तरी सायंकाळी उशिरापर्यंत उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. राज्यात दुसऱया टप्प्यात नऊ जिल्हय़ांमधील 55 मतदारसंघांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे.









