आतापर्यंत सात आमदारांनी गमावले प्राण- योगी सरकारवर राजकीय दबाव
लखनौ / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या तडाख्यात उत्तर प्रदेश राज्यही होरपळून निघालेले दिसत आहे. कोरोनामुळे इथे मृत्यूमुखी पडणाऱया लोकांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या मृत्यूच्या घटनाही वाढू लागल्याने योगी आदित्यनाथ सरकारवर स्वकियांकडूनच टीका होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळी कोरोनामुळे सलोन मतदारसंघाचे आमदार दलबहादूर कोरी यांचे निधन झाले. दलबहादूर यांच्यासह आतापर्यंत 7 आमदारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहेत. यातील 4 आमदारांचा मृत्यू गेल्या पंधरवडय़ात झाला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत चेतन चौहान आणि कमलारानी या दोन मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर दुसऱया लाटेत भाजपचे केसरसिंह गंगवार, सुरेश श्रीवास्तव आणि रमेश दिवाकर या तीन आमदारांचा मृत्यू झाला आहे.
आमदार दलबहादूर कोरी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून नाजूक झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना लखनौमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना दाद न दिल्याने शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान त्यांनी झोकून देऊन काम केले होते. प्रचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 2017 झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोरी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश चौधरी यांचा पराभव केला होता.
‘कोरोना संपलाय’ म्हणणाऱया आमदाराचाही मृत्यू
कोरोना संपला असून मी मास्क वापरणार नाही, असे म्हणणाऱया उत्तर प्रदेशातील भाजप आमदार केसरसिंह गंगवार यांचाही कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. उपचारादरम्यान त्यांना आयसीयू बेड न मिळाल्याचा फटकाही त्यांना बसला. काही दिवसांपूर्वी गंगवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात कोरोना संपला आहे आणि मी मास्क घालणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते.









