भारतीय जनता पक्ष आणि सपमध्ये चुरशीची लढत अपेक्षित
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडल्यानंतर आता ही निवडणूक मध्य उत्तर प्रदेशमधील यादव पट्टय़ात प्रवेश करत आहे. मतदानाच्या या तिसऱया टप्प्यात येत्या 20 तारखेला मतदान होत असून ते 16 जिल्हय़ांमधील 59 मतदारसंघांमध्ये होत आहे. यात बुंदेलखंडमधील 19 जागांचाही समावेश आहे.
हा टप्पा बुंदेलखंडपासून अवध विभागापर्यंत पसरलेला आहे. फिरोजाबाद, मैनपुरी, इटाह, कासगंज, हाथरस, कानपूर, कानपूर देहात, औरय्या, कनौज, इटावा, फरुखाबाद, झासी, जालौन, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा असे हे 16 जिल्हे आहेत. या टप्प्यातील 29 मतदारसंघांमध्ये यादव समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. 2017 पर्यंत येथे समाजवादी पक्षाचे वर्चस्व होते.
आठ जिल्हय़ांचा समावेश
मैनपुरी, इटावा, फिरोजाबाद, कासगंज, इटाह, फरुखाबाद, कनौज आणि औरय्या हे आठ जिल्हे यादव प्रभावित मानले जातात. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा असणाऱया मुलायमसिंग यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती या आठ जिल्हय़ांमधून अनेकदा विधानसभा किंवा लोकसभेवर निवडून आलेले आहेत. तथापि, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने समाजवादी पक्षाला पराभूत केले होते. भाजपने या 29 मतदारसंघांपैकी 23 ठिकाणी विजय मिळविला होता. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी सरस राहिली होती. त्यामुळे यंदा या जागांवर काय होणार, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. चुरशीची लढत होईल, असे अनुमान आहे.
सपला केवळ 47 जागा
2017 च्या विधानसभा निवडणुकीत सपला उत्तर प्रदेशातील एकंदर 403 जागांपैकी केवळ 47 जागा मिळाल्या होत्या. यादव पट्टय़ात केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, 2012 च्या विधानसभा निवडणुकीत याच पट्टय़ाने सपला 25 जागा तर भाजपला अवघी 1 जागा दिली होती. यावेळी स्वतः अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. अखिलेश यादव करहाल तर शिवपाल यादव जसवंतनगरमधून उभे आहेत.
भाजपनेही कसली कंबर
यादव पट्टय़ात पुन्हा एकदा मोठा विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 2017 आणि 2019 या अनुक्रमे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची पक्षाची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी पक्षाने आपले सर्व महत्त्वाचे प्रचारक येथे उतरविले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य इत्यादी दिग्गज नेत्यांचा प्रचारात मोठा सहभाग राहिला.
राम मंदिराचा लाभ शक्य
अवध विभागात अयोध्याही येत असल्याने राम जन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या योजनेचा लाभ भाजपला मिळू शकेल, असे तज्ञांचे अनुमान आहे. राम मंदिरामुळे हिंदू समाजातील सर्व घटकांचा भाजपकडे ओढा असून त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण शक्मय होईल, असे वातावरण आहे. मात्र, समाजवादी पक्षानेही येथे प्रयत्नांची पराका÷ा चालविली असून आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याचा त्या पक्षाचा जोरदार प्रयत्न राहणार आहे.
भाजपचे वर्चस्व
या तिसऱया टप्प्यातील बुंदेलखंडसह 59 मतदारसंघांपैकी भाजपने 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 49 जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला अवघ्या 9 जागा मिळाल्या होत्या. तथापि, 2012 च्या निवडणुकीत येथे समाजवादी पक्षाला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदा 2012 ची पुनरावृत्ती होणार की 2017 ची पुनरावृत्ती होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
बुंदेलखंड भाजपचा बालेकिल्ला
तिसऱया टप्प्यात यादव पट्टय़ासह बुंदेलखंडमध्येही मतदान होत आहे. येथे पाच जिल्हे असून 19 जागा आहेत. मात्र, यापैकी झांशी, जालौन, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा या पाच जिल्हय़ातील 13 मतदारसंघांमध्ये तिसऱया टप्प्यात मतदान होत आहे. उरलेल्या चित्रकूट आणि बांदा जिल्हय़ांच्या 6 मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यात 24 फेब्रुवारीला मतदान होत आहे. बुंदेलखंडात भाजपने नेहमीच चांगली कामगिरी बजावली आहे. 2017 च्या निवडणुकीत पक्षाने येथे 19 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या तर 2012 मध्येही याच भागात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
उलटसुलट अनुमाने व्यक्त
पहिल्या दोन टप्प्यांच्या 113 जागांमध्ये कोणाची सरशी झाली आहे, यावर तज्ञांची उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यांमध्ये भाजपने 113 पैकी 91 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी या दोन टप्प्यात पक्षाची कामगिरी कशी होते? यावर बरीच चर्चा सुरू आहे. या 113 मतदारसंघांपैकी 40 हून अधिक मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांची भूमिका निर्णायक मानली जाते. जाट आणि दलित मतदारांची संख्याही जवळपास प्रत्येक मतदारसंघात लक्षणीय आहे. येथेही चुरस असण्याची शक्मयता आहे.









