ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
रशिया आणि युक्रेन यांच्यात दहा दिवसांपासून सुरू असलेले युद्ध शिगेला पोहचले असतानाच उत्तर कोरियाने आज सकाळी एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेला समुद्राच्या दिशेने हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
उत्तर कोरियाने यावर्षी आतापर्यंत एकूण नऊ क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाने सात क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली, ज्यामध्ये 2017 नंतर आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राचाही समावेश आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भडकवण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी हे पाऊल उचलल्याचं त्या काळात बोललं जात होतं. दरम्यान, उत्तर कोरिया आपले शस्त्रास्त्र तंत्रज्ञान सुधारण्यावर भर देत असून, याद्वारे अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.









