सकाळच्या सत्रात चर्चा करूनही व्यर्थ : विरोधी पक्ष सदस्यांतून तीव्र नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारपासूनच उत्तर कर्नाटक विकासाबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आग्रह धरला होता. मात्र उत्तर कर्नाटक विकासाबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने मंगळवारीही सकाळच्या सत्रामध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही मंत्र्यांना सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली. बऱयाच उशिराने मंत्री दाखल झाल्याने मंगळवारी उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा सुरू झाली. मात्र भोजन विरामाची वेळ झाल्याने पुन्हा दुपारच्या सत्रात चर्चा करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला.
उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी या ठिकाणी अधिवेशन घेतले जाते. मात्र मंत्रीच नसल्यामुळे आम्ही तक्रारी आणि विकासाबाबत चर्चा करायची कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभापती बसवराज होरट्टी यांनीदेखील यावेळी उपसभापतींकडे सूत्रे सोपवून विश्रांती घेतली. एकूणच उत्तर कर्नाटकाबद्दल कोणाला काहीच काळजी नसल्याचे दिसून आले.
सकाळच्या सत्रात सर्वांनीच उत्तर कर्नाटकवर विशेष चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अनेकांनी म्हादई, कृष्णा अप्पर जलाशय यावर जोरदार चर्चा केली. मात्र मंत्रीमहोदय नसल्याने चर्चा करून काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला.
विधानपरिषद सदस्य श्री कंठेगौडा यांनी कृष्णानदीचा उगम आणि कृष्णानदीवर असलेल्या अलमट्टी धरणाबाबत माहिती दिली. याचबरोबर कृष्णा अप्पर जलाशय विकासाबाबत सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.









