ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, तरी देखील रुग्ण संख्या लक्षात घेत उत्तराखंड सरकारने 9 जूनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत कोरोना कर्फ्यू वाढवीत असल्याची घोषणा केली आहे. या दरम्यान, रेशन दुकाने दोन दिवस आणि स्टेशनरी दुकाने एक दिवस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच आता सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. आता पर्यंत सकाळी 8 ते सकाळी 11 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती.

तीरथ सिंह रावत सरकारचे प्रवक्ता सुबोध उनियाला यांनी सोमवारी सांगितले की, रेशन दुकाने आठवड्यात दोन दिवस म्हणजेच एक आणि पाच जून या दिवशी उघडली जाणार आहेत. यासोबतच 1 जून रोजी एक दिवस स्टेशनरी दुकाने देखील सुरू केली जाणार आहेत. तसेच आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी ये जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील 24 तासात प्रदेशात 1226 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 32 जणांनी आपला जीव गमावला. तर सद्य स्थितीत प्रदेशात 30,000 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकूण रुग्णांचा आकडा 3,28,338 वर पोहचला असून यातील 2.85 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.









