मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची घोषणा
► वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता कायदा लवकरच लागू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री धामी यानी ट्विट करत दिली आहे. धामी सरकारने समान नागरी संहितेचा मसुदा तयार केला आहे.
उत्तराखंड सरकारने समान नागरी संहिता तयार करण्यासाठी मार्च 2022 मध्ये तज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीकडून सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया तसेच सूचना मागविण्यात आल्या होत्या. या समितीला सुमारे 2 लाख 31 हजार सूचना प्राप्त झाल्या होत्या.
उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा ब्ल्यूप्रिंट तयार झाला असून यानुसार मुलींचे विवाहासाठीचे वय वाढविण्यात येणार आहे. याचबरोबर मसुद्द्यात पती-पत्नी दोघांनाही घटस्फोटाचे समान आधार उपलब्ध होतील. सध्या पसर्नल लॉ अंतर्गत पती आणि पत्नीकडे घटस्फोसाठी वेगवेगळे आधार उपब्लध आहेत. तसेच नव्या कायद्याच्या मसुद्यात आर्थिक देखभालीचीही काळजी घेण्यात आली आहे.
याचबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप जाहीर करणे अनिवार्य असणार आहे. ही एक प्रकारची स्वयंघोषणा राहणार असून याचे एक वैधानिक स्वरुप असणार आहे. तर या मसुद्यात कमावत्या मुलाच्या मृत्यूनंतर पत्नीला मिळणाऱ्या भरपाईत वृद्ध आईवडिलांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचा मुद्दा सामील करण्यात आला आहे. संबंधित महिलेने पुनर्विवाह केल्यास पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या भरपाई रकमेत त्याच्या आईवडिलांचाही हिस्सा असणार आहे.
केंद्र सरकारने आता राष्ट्रीय पातळीवर समान नागरी संहितेचा मुद्दा पुन्हा उचलून धरल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. समान नागरी संहितेला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे. कायदा आयोगाने समान नागरी संहितेच्या आवश्यकतेवर नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता लोक तसेच मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांच्या सदस्यांसह विविध घटकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.









