वृत्तसंस्था / चंपावत
उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्य़ात वऱहाडींनी भरलेली जीप 300 मीटर खोल दरीत कोसळल्याने 14 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. चंपावतच्या सुखीढांग-रीठा साहिब मार्गावर मंगळवारी पहाटे सुमारे 3 वाजता ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेच्या कारणांचा अद्याप शोध लागला नाही. परंतु क्षमेतहून अधिक प्रवासी भरल्याने दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
चंपावत जिल्हय़ाच्या डांडा क्षेत्रात सोमवारी रात्री विवाहसोहळय़ातून परतणारे एक वाहन दरीत कोसळले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. तर दोन गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनातून प्रवास करणारे लोक हे टनकपूर येथील पंचमुखी धर्मशाळेत झालेल्या विवाहात सामील होऊन घरी परतत होते.
बचाव पथक, एसडीआरएफ, प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर उर्वरित दोन मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन जखमींना टनकपूर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विनीत तोमर यांनी दिली आहे.









